बारामती,
Sunetra Pawar takes charge of Baramati बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या आकस्मिक निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरावलोकन कार्यक्रम जाहीर केला असून १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे. १० मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर होणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी पोटनिवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीतून उमेदवारीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीतून पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत यावर एकमत झाले. ही बैठक ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीतील निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, यासाठी पक्ष प्रयत्नशील राहणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, येऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पार्थ पवारयांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. गाभा समितीच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या बैठकीच्या तयारीवरही चर्चा झाली. येत्या काही दिवसांत वरळी येथील सभागृहात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. त्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम १६४(४)नुसार, विधिमंडळाचे सदस्य नसतानाही एखाद्या व्यक्तीस मंत्रीपदाची शपथ देता येते; मात्र शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीने विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवणे बंधनकारक असते. अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळेच सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.