‘टीबी’नियंत्रणात गोंदियाचा ‘महाआरोग्य सन्मान’

- क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात राज्यात दुसरा - ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ ने जिल्हा क्षयरोग विभागाचा गौरव

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
गोंदिया,
maha-arogya-samman-2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्ष २०२५-२६ मध्ये गोंदिया जिल्ह्याने क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या १४ विविध निर्देशकांनुसार जिल्ह्यांचे रँकिंग करण्यात येते. त्या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत गोंदियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरीय सोहळ्यात गोंदिया जिल्हा क्षयरोग विभागाला ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
g
 
 
जिल्ह्यात क्षयरोग कार्यक्रमांतर्गत संशयित रुग्णांचा शोध, थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या, नि:शुल्क औषधोपचार, नियमित फॉलोअप, समुपदेशन, निक्षय पोर्टलवर नोंदणी, निक्षय पोषण योजनेचा लाभ, सहवासितांची तपासणी अशा सर्व बाबींवर काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी पर्यवेक्षणामुळे कार्यक्रमाला बळ मिळाले.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. गोल्हार यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्त व अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक आरोग्य सेवा (मुंबई) डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक आरोग्य सेवा (पुणे) डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन यांच्यासह राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित होते. उपलब्ध साधनसामग्री व मर्यादित मनुष्यबळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी डॉ. अभिजीत गोल्हार व त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले आहे.
 
 
जनजागृती, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे आम्ही काम केले. आठही तालुक्यांतील आरोग्य अधिकार्‍यांचे नियोजन, गावपातळीवरील आरोग्य कर्मचार्‍यांची मेहनत आणि डेटा सादरीकरणातील अचूकता यामुळेच राज्यात द्वितीय क्रमांक मिळवता आला. हा सन्मान संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा आहे,
- डॉ. अभिजीत गोल्हार
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी, गोंदिया