अवकाळी पावसाचा तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला फटका

(अवकाळीने मक्यासह रब्बी पिके भुईसपाट)

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
चामोर्शी, 
unseasonal-rains : गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागासह चामोर्शी तालुक्यातही सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली. यात रब्बी पिकांसह मका पिकाला जब्बर फटका बसला असून पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे.
 
 
 
unseasonal-rains
 
 
 
तालुक्यातील घोट, येणापूर, चामोर्शी व भेंडाळा परिसरातील शेतकरी खरिपातील धानपिक निघाल्यावर रब्बी पिकांची लागवड करीत असतात. यात मुख्यत्वे लाखोळी, मूग, उडीद या प्रमुख पिकांची लागवड करण्यात आली आहे. पीक काढणी हंगाम सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर काही शेतकरी रब्बी पिकांची काढणी करून पीक मळणी करण्यासाठी ढीग करून ठेवले होते. मात्र ढीग पाण्याखाली आल्याने पिकांची गुणवत्ता घसरून भाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित पीक काढणी कामात अडथळा निर्माण झाला आहे. लाखोळी व तूर पिकाची काढणी, मळणी कामे सुरू असताना अवकाळी पावसाचे विघ्न शेतकर्‍यांना अडचणीचे ठरले आहे.
 
 
घोट, येणापूर, चामोर्शी व भेंडाळा परिसरातील मका पीक वादळी वार्‍यासह गारपीटीने नेस्तनाबूत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे सध्या मका पीक तुर्‍यावर असताना वादळी वार्‍यासह, गारपीट झाल्याने उभे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी केलेला लागवड खर्च वाया जाऊन आर्थिक नुकसान झाले आहे. कळमगाव येथील शेतकरी गणपती सखाराम चाटारे यांनी दोन एकर शेतात मका पिकाची लागवड केली. पीक वाढीवर होते. अशातच वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने उभे पीक आडवे झाले आहे. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केली आहे.
 
 
अवकाळी पाऊस खड्डयात पाणी साचून पाण्यातून वाट काढीत वाहनधारकांना जावे लागत होते. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या दहेगाव जवळ मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डयात पाणी साचून डबके तयार झाले आहेत. वादळी वार्‍यासह गारपिटीच्या पावसाने अनेकांच्या घरावरील कवेलू फुटले. विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला. तसेच विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडादेव यात्रापर्व अंतिम टप्प्यात असताना वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने यात्रेतील व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडत यात्रेकरूंना याचा फटका बसला आहे.