गोंदिया,
atm card froud एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचा बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ७० हजार रुपये लांबविल्याची घटना बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी गोरेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीतून उघडकीस आली. हेतराम माधोराव बोपचे (५८) रा. सरजा लान जवळ दुर्गा चौक, गोरेगाव असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. सदर प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. हेतराम बोपचे ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील स्टेट बैंक आफ इंडीयाच्या बँक परिसरातील एटीएम मध्ये पैसे काढण्याकरीता गेले होते.
यावेळी त्यांनी दहा हजार रुपयाची रक्कम एटीएम मधून काढली. मात्र, त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे एसएमएस आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना पैसे काढल्याचे एसएमएस आले नसल्याचे सांगितले. यावर संबंधित दोन्ही अनोळखी व्यक्तींनी त्यांना एटीएम कार्ड पुन्हा मशीन मध्ये टाकण्याचे सांगून आपले मोबाईल नंबर नमूद करण्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपला एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकून मोबाईल क्रमांक समाविष्ट करत असताना दोघांनी त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. दरम्यान, बोपचे यांच्या मोबाईलवर ६ फेब्रुवारी रोजी ३० हजार व ७ फेब्रुवारी रोजी ४० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून काढल्याचे मेसेज आले. यावेळी त्यांनी आपले बँक खाते तपशील तपासणी केली असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ६ व ७ फेब्रुवारी रोजी टप्प्याटप्प्याने ७० हजार रुपये काढलयाचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या एटीएम कार्डची तपासणी केली, यावेळी त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल झाल्याचे व त्यांच्या जवळील एटीएम कार्ड बसंतलाला नागारिया नावाच्या व्यक्तीचे असल्याचे दिसून आले.atm card froud यावर त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव शाखेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही अनोळखी व्यक्तींनी त्यांचा एटीएम कार्ड अदलाबद्दल केल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी गोरेगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.