लॉस एंजेलिस,
Catherine Short's suicide हॉलिवूडमधून दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज विनोदी कलाकार मार्टिन शॉर्टच्या मोठ्या मुली कॅथरीन शॉर्टचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कॅथरीनने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेमुळे शॉर्ट कुटुंबात शोककळा पसरली आहे. सोमवारी संध्याकाळी लॉस एंजेलिस पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिस आणि आपत्कालीन सेवा संध्याकाळी ६.४० वाजता हॉलिवूड हिल्स येथील कॅथरीनच्या घरी पोहोचली, तिथे ती मृतावस्थेत आढळली. प्राथमिक चौकशीत मृत्यूचे कारण स्वतःवर गोळी झाडणे असल्याचे स्पष्ट झाले आहे, अधिकृत तपास सुरू आहे.

मार्टिन शॉर्टसाठी कॅथरीनचा मृत्यू मोठा धक्का ठरला आहे. कुटुंबाच्या प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन जारी करून कॅथरीनच्या निधनाची दुःखद बातमी दिली. निवेदनात म्हटले आहे की, कॅथरीन सर्वांना प्रिय होती आणि तिने दिलेल्या आनंदासाठी तिला नेहमीच लक्षात ठेवले जाईल. तसेच, या कठीण काळात कुटुंबासाठी गुप्तता राखण्याची विनंती करण्यात आली आहे. कॅथरीन हे मार्टिन शॉर्ट आणि त्यांच्या दिवंगत पत्नी नॅन्सी डोल्मन यांची मोठी मुलगी होती. नॅन्सी डोल्मन यांचा २०१० मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला होता. कॅथरीन नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात क्वचितच दिसली. मनोरंजन क्षेत्राची निवड न करता, कॅथरीनने मानसिक आरोग्याशी संबंधित कार्यात स्वतःला समर्पित केले. तिने स्वतःच्या नावाने स्वतंत्र क्लिनिक सुरू केले होते आणि तज्ञ मानसोपचारतज्ज्ञांसोबत अर्धवेळ काम केले. तिच्या कार्यामुळे अनेकांना मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन मिळत होते.