बुलढाणा,
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय 'Granthotsav 2025' ग्रंथोत्सव २०२५ चा मोठ्या उत्साहात समारोप झाला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन दि. २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. दोन दिवसात ३ लाख रूपयांच्या ग्रंथाची विक्री झाली. ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
'Granthotsav 2025' ग्रंथोउत्सवामध्ये विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना परिसंवाद व कविसंमेलन च्या माध्यमातून मिळाली. पहिल्या सत्रात ‘वाचन संस्कृती: काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद पार पडला. प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत नेमिनाथ सातपुते, सुनील वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार आणि रफिक कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. दुपारच्या सत्रात सुभाष किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गोविंद गायकी, सर्जेराव चव्हाण, राजेंद्र काळे, रमेश आराख आणि वैशाली तायडे यांसारख्या कवींनी आपल्या बहारदार कविता व गझल सादर केल्या. या दोन दिवसीय महोत्सवात केवळ चर्चासत्रेच नाही, तर पुस्तक खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. बुलढाणेकर ग्रंथप्रेमींनी यावर्षी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ग्रंथांची खरेदी केली, जे वाढत्या वाचन संस्कृतीचे सकारात्मक लक्षण मानले जात आहे. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, साहित्यिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व वाचक उपस्थित होते. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.