अहेरी,
'Hindu Sammelan' भारतीय हिंदू समाज स्वभावतः सहिष्णू आहे. आपल्या संतांनी प्रतिकूल परिस्थितीतही धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवली. आजच्या काळात प्रत्येक घरात जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची नितांत गरज असून, हिंदुत्वाच्या जागृतीतूनच भारत जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रशांत दाणी यांनी केले.
आल्लापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर बुधवारी आयोजित भव्य Hindu Sammelan' ‘हिंदू संमेलना’त मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खंडवा येथील मुनी पंकज महाराज ‘हिंदुस्थानी फक्कड’, शंकर महाराज नैताम आणि संमेलनाचे संयोजक नागनाथ पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे कार्य आणि ‘पंच परिवर्तन’ आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य करताना दाणी म्हणाले की, 1925 मध्ये डॉ. हेडगेवारांनी लावलेले हिंदू राष्ट्र पुनरुत्थानाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. शताब्दी वर्षानिमित्त त्यांनी समाजाला कुटुंब प्रबोधन, स्व-जागर, सामाजिक समरसता आणि पर्यावरण रक्षण या ‘पंच परिवर्तना’चा मंत्र दिला. कुटुंब प्रबोधनात घरात संस्कारांची जोपासना करणे, स्व-जागरमध्ये स्वदेशी आणि स्व-संस्कृतीचा अभिमान बाळगणे, सामाजिक समरसतामध्ये जातीभेद विसरून एकसंध होणे, नागरिक कर्तव्यमध्ये राष्ट्रप्रती जबाबदारी पार पाडणे व पर्यावरण रक्षणमध्ये निसर्ग संवर्धन आणि प्लास्टिकचा त्याग असे सांगितले.
पर्यावरणाच्या गंभीर स्थितीवर बोलताना दाणी यांनी इशारा दिला की, पुढील महायुद्ध पाण्यावरून होण्याची शक्यता आहे. शोभेच्या झाडांपेक्षा आंबा, लिंब यांसारखी ऑक्सिजन देणारी झाडे लावा. गाईंच्या पोटात जाणारे प्लास्टिक ही चिंतेची बाब असून प्रत्येकाने महिन्यातून एक झाड लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. पंकज महाराज फक्कड यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, संतांनीच भारतीय संस्कृतीला विकृतीपासून वाचवले आहे. लोकसंख्या असंतुलनावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, भारत हे मुळातच हिंदू राष्ट्र आहे. धर्मरक्षणासाठी केवळ शास्त्राचा अभ्यास पुरेसा नसून, गरज पडल्यास शस्त्र उचलण्याची सिद्धता ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यांनी क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्याचाही गौरव केला.
Hindu Sammelan' संमेलनापूर्वी आल्लापल्लीतील विविध मंदिरांमधून महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य कलश यात्रा काढली. कार्यक्रमस्थळी महिलांनी पर्यावरण रक्षण, मूकनाट्य आणि भरतनाट्यम यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचालन कीर्ती गागापूरप व मनीषा तोम्बरलावार यांनी केले. या संमेलनाला आल्लापल्ली व परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.