‘मिशन जिंकूया’मुळे गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना नवी दिशा

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
वेध...
नंदकिशोर काथवटे
students of gadchiroli गडचिरोली म्हटलं की डोळ्यासमोर येतात घनदाट जंगलं, नद्या-नाले, डोंगररांगा आणि अनेक अडचणींशी झुंज देणारे जीवन. पण या दुर्गमतेच्या पलीकडे आज गडचिरोलीतील विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहू लागला आहे. स्पर्धेच्या या युगात तो आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि त्याच्या पाठीशी जिल्हा प्रशासन भक्कमपणे उभे आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या ‘मिशन जिंकूया’ या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडू लागले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ शिष्यवृत्ती परीक्षेपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. तज्ज्ञ मार्गदर्शन, ओएमआर सराव, परीक्षा शुल्काची सुविधा, शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग आणि अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा दिली जात आहे. अलिकडेच शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या 20 विद्यार्थ्यांना मुंबईची हवाई सफर घडवून आणण्यात आली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला.
 
 

गडचिरोली  
 
 
मंत्रालय, विधान भवन, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण अशा ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेट देत ज्ञानाचा आणि अनुभवाचा नवा खजिना उघडला. ही सहल केवळ पर्यटन नव्हती, तर त्यांच्या स्वप्नांना आकाशाची उंची देणारा अनुभव होता. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव तथा गडचिरोलीचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. गडचिरोलीतील विद्यार्थी अत्यंत तेजस्वी आहेत, असे सांगत त्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. शिक्षक, डॉक्टर, कलेक्टर किंवा पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाèया या मुलांना सर्वोत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या स्वप्नांना शासनाने दिलेली ही दाद त्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ देणारी आहे. खरे पाहता, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेची कमी नाही; कमी आहे ती संधींची. ‘मिशन जिंकूया’सारख्या उपक्रमांमुळे ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन, उत्तम शिक्षक आणि आधुनिक सुविधा मिळाल्या, तर ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत. उलट, कठीण परिस्थितीत वाढल्यामुळे त्यांच्यातील जिद्द आणि चिकाटी त्यांना अधिक सक्षम बनवते. पुढील वर्षी शंभर विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्याचा आणि ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हैदराबाद व बंगळुरू येथील रिसर्च सेंटरला पाठविण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. हा केवळ दौरा नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील संधींचे दार उघडण्याचा प्रयत्न आहे. अशा एक्सपोजरमुळे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा विस्तार होतो, त्यांची स्वप्ने अधिक स्पष्ट होतात आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी नवा उत्साह निर्माण होतो. आज गरज आहे ती या सकारात्मक उपक्रमांना सातत्य देण्याची.
 
जिल्हा प्रशासनाने दाखवलेली दूरदृष्टी आणि बांधिलकी नक्कीच कौतुकास्पद आहे. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातूनही विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहू शकतो, ती पूर्ण करू शकतो, यावर ‘मिशन जिंकूया’ने शिक्कामोर्तब केले आहे. दुर्गमतेतून उंच भरारी घेणाèया या विद्यार्थ्यांना सलाम! योग्य संधी आणि भक्कम पाठबळ मिळाले, तर गडचिरोलीचा विद्यार्थी केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर राज्य आणि देशाचाही अभिमान ठरेल, याबद्दल शंका नाही. आजच्या काळात स्पर्धा तीव्र आहे. पण स्पर्धेत टिकण्यासाठी आत्मविश्वास, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात. ‘मिशन जिंकूया’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ यशाचे ध्येय देत नाही, तर त्यासाठी लागणारी मानसिक ताकदही देतो. गडचिरोलीच्या मातीतील ही मुले जर अशाच पद्धतीने संधींचा लाभ घेत राहिली, तर उद्याचे डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि वैज्ञानिक याच दुर्गम भागातून घडतील, अशी आशा नक्कीच बाळगू शकतो. आज गरज आहे ती या सकारात्मक उपक्रमांना सातत्य देण्याची. जिल्हा प्रशासनाने दाखविलेली दूरदृष्टी आणि बांधिलकी कौतुकास्पद आहे.students of gadchiroli शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, गडचिरोलीच्या दुर्गम मातीत उमलणारी ही स्वप्ने आता केवळ कल्पना राहिलेली नाहीत, तर ती वास्तवात उतरण्याच्या दिशेने ठाम पावले टाकत आहेत. प्रशासनाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा संगम झाला, तर कोणतीही दुर्गमता आड येऊ शकत नाही. ‘मिशन जिंकूया’सारखे उपक्रम ही केवळ योजना नसून ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या भविष्याची भक्कम पायाभरणी आहे. ही जिद्द, हा आत्मविश्वास आणि हे पाठबळ कायम राहिले, तर गडचिरोलीचा विद्यार्थी उद्याच्या भारताच्या घडणीत निर्णायक भूमिका बजावेल, यात तिळमात्र शंका नाही.
 
9922999588