नीती आयोगाची आढावा बैठक
वाशीम,
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन आणि एकत्रित समन्वयाने कामे पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत, असे स्पष्ट निर्देश NITI Aayog नीती आयोगचे केंद्रीय प्रभारी अधिकारी मुथ्थुक्रिष्णन शंकरनारायणन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात निती आयोग आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे, उपशिक्षणाकारी गजानन डाबेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
NITI Aayog शेतकर्यांचे हित लक्षात घेता पिकांना योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा यासाठी आवश्यक प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. चिया पिकाचे उत्पादन वाढीस लागले असून बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकर्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्यावश्यक नियोजन आवश्यक असल्याचे प्रभारी अधिकार्यांनी यावेळी नमूद केले.
गर्भवती महिलांची तपासणी, उपचार सुविधा आणि शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य योजनांच्या निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत.पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. लाळखुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावीपणे राबवून पशुधनाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नीती आयोगने निश्चित केलेल्या इंडिकेटरनुसार सातत्याने प्रगती साधणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण, स्वच्छता, पोषण व पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतील निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या तिमाहीत अनेक निर्देशांकांत सुधारणा झाल्याची नोंद करण्यात आली. सर्व विभागांनी इंडिकेटर सुधारणा हेच प्राथमिक ध्येय ठेवून ठोस पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले.
NITI Aayog संपूर्णता अभियान २.० अंतर्गत आकांक्षीत जिल्हा ५ निर्देशांक व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत ६ निश्चित करण्यात आलेले असे ११ निर्देशांक पूर्णत्वास नेणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करणे हे आपले सामूहिक ध्येय असून त्यासाठी सर्व विभागांनी मिशन पद्धतीने परस्पर समन्वय राखून काम करावे, असे आवाहन नीती आयोगचे जिल्हा प्रभारी अधिकारी मुथ्थुक्रिष्णन शंकरनारायणन यांनी केले. बैठकीस मुख्याधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.