रेस्यू पथक अन् बिबट्याची ‘फ्री स्टाईल’

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू; पथकातील दोन जखमी
 
वर्धा/सेलू,
सेलू शहराशेजारीच Rescue team and leopard बिबट्याचा मुत संचार होत असल्याची माहिती मिळताच प्रादेशिक वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. पोलिस, पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सहकार्य घेत बिबट्याचा रेस्यू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रेस्यू चमूवर अचानक बिबट्याने हल्ला केला. रेस्यू चमू आणि बिबट्याच्या फ्री स्टाईलमध्ये कौस्तूभ गावंडे, शुभम बोबडे हे दोघे जखमी झाले. जखमी अवस्थेतही गावंडे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्याला जाळं टाकून रेस्यू करण्यात यश आले. ही थरारक घटना बुधवारी रात्री घडली असून रेस्यू केलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मादी बिबट नऊ महिने वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.
 
 
Rescue team
 
Rescue team and leopard  सेलू शहरालगत बुटीबोरी—तुळजापूर महामार्गाशेजारील विद्याभारती कॉलेज परिसरातील वाघमारे यांच्या मका पिकात जखमी बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळाल्यावर सेलू पोलिस, वनविभाग व पिपल फॉर अ‍ॅनिमल्सची चमू बिबट्याला रेस्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. बिबट्या शेतात असल्याची माहिती मिळताच रेस्यू पथकाने आपला मोर्चा तेथे वळविला. जाळं टाकून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न होण्यापूर्वीच रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मका व हरभरा पिकातून बाहेर आलेला बिबट्या सेलू गावाच्या दिशेने सरकू लागला. दरम्यान, त्याला जाळ टाकून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण बिबट्याने जाळ्यातून निसटत शुभम बोबडे याच्यावर हल्ला करून हात व छातीवर चावा घेतल्यावर तो पुन्हा गावाकडे वळू लागला. त्यानंतर कौस्तुभ गावंडे यांनी जीवावर उदार होत बिबट्या जाळ्यात अटकवले. बिबट्याला उपचारासाठी पिपरी मेघे येथील करुणाश्रमात तर दोन्ही जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान रेस्यू केलेल्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. गुरूवारी नियमानुसार शवविच्छेदनाअंती बिबट्याच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
 
 
Rescue team and leopard  बिबट्याला रेस्यू केल्यावर तात्काळ आवश्यक वैद्यकीय सहाय्य देण्यात आले. पण, उपचारादरम्यान या मादी बिबट्याची प्रकृती खालावत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक निरीक्षणात बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शवविच्छेदन अहवाला नंतर ते स्पष्ट होईल. वनविभागाकडून पुढील आवश्यक कार्यवाही नियमानुसार सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखेडे यांनी दिली.
 
 
बिबट्याला धरून दाबले
Rescue team and leopard रेस्यू पथकाचे लीडर कौस्तुभ गावंडे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा मार्ग अडवला. पण, दोन पावलं मागे सरकलेल्या बिबट्याने काही क्षणातच गावंडे यांच्यावर झडप घातली. या कठीण प्रसंगी गावंडे यांनी धाडसाने करत बिबट्याला दोन्ही हातांनी कवेत घेत जमिनीवर पाडून दाबून धरले. दरम्यान, रेस्यू पथकातील इतर सदस्यांनी बिबट्या आणि गावंडे यांच्यावर जाळ टाकले. सुमारे पंधरा मिनिटाची झटापट व शर्तीच्या प्रयत्नाअंती गावंडे यांची जाळ्यातून सुटका करीत बिबट्याला पकडण्यात यश आले. झटापटीत गावंडे त्यांच्या दोन्ही मांडी व मनगटावर बिबट्याने दात व नखांनी गंभीर दुखापत केली. ही घटना थरकाप पडविणारीच होती. मात्र अशा परिस्थितीत भीतीला बळी पडून चालत नाही. आमच्यासाठी प्रत्येक रेस्यू मोहीम ही फत कर्तव्य नसून सामाजिक जबाबदारी असते. त्या क्षणी माझ्यासमोर एकच विचार होता. तो म्हणजे बिबट गावात शिरला तर निरपराध नागरिकांचे जीव धोयात येतील. त्यामुळे त्याला थांबवणे गरजेचे होते. मी काही विशेष केले असे मला वाटत नाही. पण, माझ्या संपूर्ण रेस्यू पथकाने अतिशय धाडसाने व समन्वयाने काम करीत बिबट्याला पकडले. वन्यप्राणी आपले शत्रू नाहीत. ते जखमी किंवा घाबरलेले असल्यामुळे आक्रमक होतात. अशा वेळी नागरिकांनी अफवांना बळी न पडता सुचनांचे पालन करीत वनविभागाला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया कौस्तुभ गावंडे यांनी दिली.