परतवाड्यातील शिवतीर्थ अतिक्रमणाच्या विळख्यात

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
जयस्तंभ चौकात वाहतूक पोलिस बेपत्ता
अचलपूर, 
Shiva Tirtha in Patarwada परतवाडा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जयस्तंभ चौक परिसरात शिवतीर्थ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अतिक्रमणाने घेरलेले आहे. चारचाकी मालवाहू वाहने पुतळ्याच्या अवतीभोवती उभी राहत असल्याने येथे पुतळा आहे की नाही, हे ही दिसेनासे झाले आहे.
 
 
amt
 
परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये लाखो रुपये खर्चून शिवतीर्थ तयार करण्यात आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच जयस्तंभ तयार करण्यात आले आहे. परंतु त्याच ठिकाणी माल वाहतूक वाहनांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे सदैव या ठिकाणी वाहने उभी असतात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चहू बाजुने वाहने उभी केली जात आहे. शिवतीर्थच्या एका बाजुने परतवाडा ते अमरावती रोड तर दुसरीकडे अचलपूरकडे जाणारा रस्ता असल्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुक सुरू असते. त्याच ठिकाणी माल वाहतूक वाहने, ट्रॅक्टर, मिनी ट्रक, ऑटोरिक्षा आदी वाहने लावलेली असतात. त्यामुळे अनेकदा ट्रॅफिक जाम होत असते. सोबतच शिवतीर्थावर असलेल्या बगीचामध्ये जाणारा रस्ता पूर्णतः वाहनांनी वेढलेला आहे .
 
 
Shiva Tirtha in Patarwada  नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या वेळी एक दिवस मात्र येथील नियमित उभी असणारी वाहने वाहतूक पोलिसांनी हटवली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवतीर्थ जयस्तंभ फुलून दिसत होते. त्यामुळे सौंदर्यात भर पडली होती. दुसर्‍याच दिवसापासून स्थिती जैसे थे झाली. अमरावतीहून येणारी वाहने तसेच अचलपूरकडे जाणार्‍या वाहनांना चांगलाच त्रास होत असतो. जयस्तंभ चौकात वाहतूक पोलिसांची हजेरी नगण्य आहे. सोबतच या चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहे. शिवतीर्थ व जयस्तंभ चौकातील मालवाहू वाहनांकरिता इतरत्र जागा द्यावी व स्थानिक अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.