नागपूर,
प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर-मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक Special train विशेष गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी १ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष गाडी आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी नागपूर येथून प्रस्थान करेल. गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर गाडी गुरुवारी आणि रविवारी मडगाव येथून प्रस्थान करेल. नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडी विद्यमान वेळापत्रक आणि थांब्यानुसार पुढील आदेशापर्यंत धावेल.
मध्य रेल्वेत १२६ फुकटे प्रवासी
एक लाख २ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल
नागपूर : विनातिकीट प्रवाशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत काही तासांत १२६ फुकटे प्रवासी आढळले. विविध रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी किंवा सोबतच्या लगेजची तिकीट न काढता बिनधास्त फुकट प्रवास करणार्यांना थडा शिकविण्यासाठी आकस्मिक तिकीट तपासणी राबविण्यात येते. विशेष तपास पथके तयार करून नागपूर-बैतूल-घोडाडोंगरी या रेल्वे मार्गावर पाठविण्यात आले. त्यांनी ट्रेन नंबर १२२९५ संघमित्रा सुपरफास्ट, १२७२१ दक्षिण सुपरफास्ट, १२२९६ संघमित्रा व २२३५१ बेंगळुरू सुपरफास्टमध्ये तिकीट तपासणी मोहीम सुरू केली. रेल्वे अधिनियमानुसार कारवाई करतानाच त्यांच्याकडून तपासणी पथकाने १ लाख २ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.
रेल्वेगाडीत साप शिरल्याच्या वृत्ताने उडाली खळबळ
नागपूर : मुंबईहून विशाखापट्टणमकडे जाणार्या रेल्वेगाडीत साप शिरल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. गाडीच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात प्राणी दिसल्याचा संशय एका प्रवाशाने व्यक्त केल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच धावपळ उडाली. ही गाडी नागपूरच्या दिशेने येत असताना रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत नागपूर स्थानकावर संबंधित डब्याची झाडाझडती घेतली. मात्र, शोधमोहीमेनंतरही सापाचा ठावठिकाणा लागला नाही. सकाळच्या सुमारास प्रवाशाने दिलेल्या माहितीनंतर रेल्वे सुरक्षा बलाला सतर्क करण्यात आले होते.ही गाडी नागपूर फलाट क्रमांक ६ वर येण्यापूर्वीच आरपीएफच्या चमून तपासणी कार्यात मदत केली.