मुंबई,
Akshay Kumar, बॉलिवूडमधील कॉमेडीची हमखास गॅरंटी मानली जाणारी अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची सुपरहिट जोडी तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत असल्याने ‘भूत बंगला’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी या जोडीने दिलेले अनेक हिट चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे असल्याने त्यांच्या पुनरागमनाकडे विशेष लक्ष लागले आहे.
या वाढत्या उत्सुकतेला आणखी उधाण देत ‘भूत बंगला’मधील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार त्यांच्या खास कॉमिक अंदाजात झळकत असून त्यांची भन्नाट ऊर्जा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. पेपी बीट्स, हाय-स्पिरिटेड सादरीकरण आणि मनोरंजक कोरिओग्राफीमुळे हे गाणं अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरत आहे. गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं असून गीतलेखन कुमार यांनी केलं आहे. गायक अरमान मलिक आणि आरवन यांच्या आवाजामुळे गाण्याला विशेष रंगत प्राप्त झाली आहे, तर Melo D यांच्या रॅपमुळे त्याला आधुनिक टच मिळाला आहे.
‘भूत बंगला’ हा चित्रपट Balaji Motion Pictures आणि Cape of Good Films प्रस्तुत करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांसारखी दमदार कलाकारांची फळी दिसणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व कलाकारांची उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग आणि अभिनय कौशल्य चित्रपटाला अधिक प्रभावी बनवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी यापूर्वीही बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजली आहे. विशेषतः Hera Pheri या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवत कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला. त्यानंतर Phir Hera Pheri नेही यशाची परंपरा कायम ठेवली. Bhool Bhulaiyaa मध्ये हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम पाहायला मिळाला, तर Garam Masala आणि De Dana Dan सारख्या चित्रपटांनीही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.या सर्व पार्श्वभूमीवर ‘भूत बंगला’मधून ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करणार का, याकडे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कॉमिक एनर्जी, भुतांचा गोंधळ आणि फुल-ऑन मनोरंजनाचा डोस घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.