नामवंत साहित्यिकांच्या घरांसमोर लागणार फलक

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
महापालिकेचा अभिनव उपक्रम
 
अमरावती, 
Amravati Municipal Corporation अमरावती शहरातील साहित्यिक, सांस्कृतिक परंपरेचा गौरव जपण्याच्या दृष्टीने अमरावती महापालिकेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नामवंत मराठी साहित्यिकांच्या निवासस्थानी नील फलक लावून त्यांचा सन्मान करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. प्रस्ताव क्रमांक २५ अंतर्गत हा विषय सभेत मांडण्यात आला. सदस्या अ‍ॅड. प्रीती हर्षल रेवने यांनी हा प्रस्ताव मांडला, तर नंदा धनंजय सावदे यांनी त्यास अनुमोदन दिले. चर्चेनंतर सभागृहाने हा ठराव सर्वानुमते मंजूर केला.
 
 
amt dks
 
या निर्णयानुसार अमरावती शहरातील दिवंगत तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या साहित्यिकांच्या निवासस्थानी नील फलक लावण्यात येणार आहेत. प्राथमिक यादीत गझलसम्राट सुरेश भट, कथाकार उद्धव शेळके, साहित्य अभ्यासक मानिक कानेड, स्वातंत्र्यपूर्व काळातील विचारवंत दादासाहेब खापर्डे, कवी मधुकर केचे, साहित्यिक प्रभाकर माचवे, समीक्षक रा. भा. पाटणकर, वसंत आबाजी डहाके, डॉ. प्रभा गणोरकर आणि नाटककार दत्ता भगत यांचा समावेश आहे. तसेच अमरावतीत वास्तव्य केलेल्या किंवा येथे कार्य केलेल्या अन्य साहित्यिकांची अधिकृत व अद्ययावत नावेही या योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश सभेत देण्यात आले. सर्वसाधारण सभेत या ठरावाला मान्यवर पदाधिकार्‍यांनी त्वरित मंजुरी दिली. महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, आयुक्त सौम्या शर्मा चांडक, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते अविनाश मार्डीकर, नाना आमले, डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी या विषयाचे महत्त्व ओळखून ठरावाला तत्काळ संमती दर्शविली.
 
 
Amravati Municipal Corporation  या नील फलकांवर संबंधित साहित्यिकाचे नाव, त्याचा कार्यकाल आणि मराठी भाषा साहित्य क्षेत्रातील योगदानाचा संक्षिप्त उल्लेख करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांना त्या साहित्यिकांविषयी थेट माहिती मिळेल. हा उपक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून शहराच्या सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.