पुणे
Anganwadi workers salary pending राज्यातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनिसांचे तीन महिन्यांचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेले नाही. मागील महिन्यापासून मदतनिसांचेही मानधन थांबवले गेले असून, या थकीत रकमेमुळे अंगणवाडी कर्मचारी आर्थिक ताणाखाली आले आहेत.
अंगणवाडीताईंना दरमहाः १३ हजार रुपये आणि मदतनिसांना ७ हजार ५०० रुपये मानधन मिळते. त्यातील ४ हजार ५०० रुपये केंद्र सरकारकडून येतात, जे महिला व एकात्मिक बालविकास आयुक्त कार्यालयाद्वारे राज्य सरकारच्या हिश्शासह थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. मागील तीन महिन्यांपासून हे केंद्रकडून येणारे पैसे थांबले असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
ग्रामीण भागातील महिला हे काम पारंपरिक कुटुंबाला हातभार लावण्यासाठी करतात. अंगणवाडी कर्मचारी दिवसातून आठ तासांपेक्षा अधिक वेळ योजनाबाह्य कामांमध्ये देतात. यामध्ये सर्वेक्षण, योजनांचा प्रचार, प्रत्यक्ष अंमलबजावणी यासारखी जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत. या कामासाठी सातत्याने मानधनवाढीची मागणी केली जात असली, तरी केंद्र व राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
अंगणवाडी संघटनांचे म्हणणे Anganwadi workers salary pending आहे की, आधी सर्वांचे मानधन पीएफएमएस या संगणक प्रणालीतून जमा होत होते. मात्र केंद्र सरकारने नवी ‘स्पर्श’ प्रणाली सुरू केली असून, त्यात अद्याप माहिती अपडेट केली गेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन थकले आहे. “हे काम कधी पूर्ण होणार आणि मानधन कधी जमा होणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही,” असे कर्मचारी म्हणतात.राष्ट्रीय मजदूर संघ, अंगणवाडी विभागाच्या प्रमुख गीतांजली थिटे यांनी सांगितले की, “अपुरे मानधन आणि कामाचा ताण यामुळे सर्वच अंगणवाडी महिला कर्मचारी त्रस्त आहेत. प्रोत्साहन भत्ता देखील अनेकदा ५ ते ७ महिन्यांनी एकत्रित रूपात मिळतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सरकार गंभीर नाही, हेच या परिस्थितीतून दिसून येते.”या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील महिला कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असून, केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे.