गडचिरोली शहरात विकासकामांचा तडाखा

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
गडचिरोली, 
Development in Gadchiroli city गडचिरोली शहराला लाभलेल्या उच्चविद्याभूषित नवनिर्वाचित नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर यांनी गडचिरोली शहराचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला असून शहरातील विविध ठिकाणी विकासकामांना धडाक्यात सुरुवात केली आहे. गडचिरोली शहराच्या सर्वांगीण आणि शाश्‍वत विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर उपस्थित होते.
 
 
bhumipoojan
 
शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रोड बांधकाम, नाली बांधकाम तसेच इतर अत्यावश्यक मूलभूत सुविधांची उभारणी हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, खराब रस्त्यांमुळे होणारी गैरसोय आणि स्वच्छतेच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. या उपक्रमांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता येणार असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे.
 
 
Development in Gadchiroli city कार्यक्रमाला नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी तसेच संबंधित प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनाप्रसंगी नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे व नियोजनबद्ध कामकाजाचे कौतुक करत विकासाच्या या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करून अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर यांनी विकासाचा वेग वाढविला आहे. केवळ आश्‍वासनांवर न थांबता कृतीतून शहराच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा ठाम निर्धार या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे.