नवी दिल्ली,
shivam-dubey टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीकडे आणखी एक पाऊल टाकले. भारताने ७२ धावांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला आणि स्पर्धेतील आपली दावेदारी अधिक मजबूत केली. मात्र या विजयावर गोलंदाजीतील त्रुटींमुळे काही प्रश्नचिन्हेही निर्माण झाली आहेत.

नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नंतर सांगितले की त्यालाही आधी फलंदाजी करायचीच इच्छा होती. फलंदाजांनी त्याची अपेक्षा पूर्ण करत झंझावाती खेळ केला आणि ४ बाद २५६ अशी प्रचंड धावसंख्या उभी केली. ही टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली. इतक्या मोठ्या धावसंख्येनंतर भारत सुमारे शंभर धावांच्या फरकाने सामना जिंकेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र गोलंदाजीदरम्यान काहीसे चित्र बदलले. विशेषतः शिवम दुबे याची कामगिरी चर्चेचा विषय ठरली. फलंदाजीची संधी न मिळालेल्या दुबेला सूर्यकुमार यादवने गोलंदाजीची जबाबदारी दिली; पण त्याने अवघ्या दोन षटकांत ४६ धावा खर्च केल्या. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या दोन षटकांत इतक्या धावा देणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. shivam-dubey चार षटकांच्या कोट्यात अनेकदा गोलंदाज इतक्या धावा देत नाहीत, त्या तुलनेत ही कामगिरी निश्चितच निराशाजनक मानली जात आहे. त्याने एक गडी बाद केला असला तरी धावांची उधळण संघासाठी चिंतेची बाब ठरली.
या सामन्यात भारताकडून सात नो-बॉल टाकण्यात आल्या, जे स्पर्धेतील सर्वाधिक मानले जात आहेत. त्यापैकी पाच नो-बॉल एकट्या दुबेकडून झाल्या. शिस्तबद्ध गोलंदाजीचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता. जर अतिरिक्त धावा रोखल्या गेल्या असत्या, तर विजयाचा फरक अधिक मोठा झाला असता, अशी चर्चा रंगू लागली आहे. shivam-dubey एकूणच, फलंदाजांनी विक्रमी धावसंख्या उभारून विजयाची भक्कम पायाभरणी केली असली, तरी गोलंदाजीतील त्रुटींवर संघ व्यवस्थापनाला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. उपांत्य फेरी जवळ येत असताना अशा चुका टाळणेच भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.