कोल्हापूर
Kolhapur vegetable prices drop, शेतकऱ्यांकडून फळभाज्या आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे त्यांच्या किमतीत घट झाली असून ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. शहरातील लक्ष्मीपुरी भाजी बाजारपेठ येथे सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असून भाजी विक्रेत्यांच्या व्यवहारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या मेथी, पोकळा आणि चाकवत यांसारख्या पालेभाज्या दहा रुपयांना एक पेंडी या दराने विक्रीस उपलब्ध आहेत. पालेभाज्यांचे दर स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी थेट बाजारात भाजी पाठवल्याने आवक वाढली असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. ताजी आणि स्वस्त भाजी उपलब्ध असल्यामुळे खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मिरचीच्या दरातही Kolhapur vegetable prices drop, काहीशी घट झाली आहे. सध्या मिरची ८० रुपये किलो दराने विकली जात असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दर कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. हॉटेल व्यावसायिक तसेच गृहिणींनी मिरचीची खरेदी वाढवली असल्याचे चित्र आहे.मात्र, पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी लसूण आणि गवार यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट काहीसे बिघडले आहे. लसूण सध्या १८० रुपये किलो दराने विकला जात असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे ४० रुपयांची वाढ झाली आहे. गवारही दीडशे रुपये किलो दराने विक्रीस असून त्यात सुमारे ३० रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दरम्यान, घरगुती वापरातील इतर भाज्यांचे दर तुलनेने परवडणारे आहेत. कांदा २५ रुपये किलो, बटाटा ३० रुपये किलो, वाटाणा ६० रुपये किलो, वराणा ८० रुपये किलो आणि कोथिंबीर १५ रुपये पेंडी या दराने विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचा भाजीपाला खर्च काही प्रमाणात आटोक्यात राहिल्याचे दिसून येते.
फळभाज्यांच्या बाबतीतही बहुतांश दर नियंत्रणात आहेत. भेंडी आणि दोडका ८० रुपये किलो, वांगी व कारली ६० रुपये किलो, गाजर ५० रुपये किलो, ढबू मिरची ८० रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत. फ्लॉवर ३० रुपये नग, शेवगा १० रुपये नग आणि कोबी २० रुपये नग या दराने विक्री होत आहे.दर कमी असल्याने लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सकाळीच मोठी गर्दी होत आहे. स्वस्त दरात ताजी भाजी मिळत असल्याने नागरिक उत्साहाने बाजारात येत असून विक्रेत्यांनाही समाधानकारक विक्री होत आहे. एकंदरीतच वाढलेल्या आवकेमुळे बाजारात दर स्थिरावले असून ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.