नप सभागृहात नगराध्यक्ष ठाकरे व उपनगराध्यक्ष चोपडा यांची पत्रकार परिषद
देवळी,
Municipal Council Deoli नगर परिषद देवळीच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७९ कोटी ३० लाख ५३ हजार ४७७ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून यासंदर्भात नगराध्यक्ष किरण ठाकरे व उपनगराध्यक्ष राहुल चोपडा यांनी नगर परिषद सभागृहात आज २७ रोजी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. व्हिजन देवळी नव्या युगाचे नवे स्वप्न या संकल्पनेवर आधारित हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाची ब्ल्यूप्रिंट असल्याचे नगराध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले. विशेष सभेत हा अर्थसंकल्प सर्व सदस्यांच्या एकमताने मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
देवळी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महिलांसाठी पिंक टॉयलेट्स, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणारी स्मार्ट सखी योजना, डिजिटल स्कूल व डिजिटल स्टडी हब, ग्रीन देवळी अंतर्गत वृक्ष लागवड तसेच महिला बचत गटांसाठी जिजाऊ बचत गट बाजार यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानाधारित प्रशासनासाठी आपलं शहर मोबाईल अॅप, सुशिक्षित युवकांसाठी को-वर्किंग स्पेस, नगराध्यक्ष फेलोशिप प्रोग्राम व नगराध्यक्ष कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चोपडा यांनी दिली.
Municipal Council Deoli सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी संत तुकाराम महाराज व संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ तुका-संताजी स्मृती विश्व उभारले जाणार आहे. शहर प्रवेशद्वार सुशोभीकरण, ऐतिहासिक शिल्पे व आकर्षक रोषणाईचीही योजना आहे. याशिवाय नगर-आरोग्य फिरते रुग्णालय, वॉटर एटीएम, स्मार्ट कचरा व्यवस्थापन, मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरण, ठक्कर बाबा योजनेतून आदिवासी विकास, माझे घर जलसाक्षर घर अभियान, सौर ऊर्जा प्रकल्प, अडथळा मुत शहर मोहीम, विसावा उद्यान, स्मार्ट फेरीवाला झोन आणि हॅपी स्ट्रीट अशा विविध योजनांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे पाणी कर कमी होण्याचे बोलले जात होते पण पाणीकरात कोणतीही कपात न करता विद्यमान दर कायम ठेवण्यात आल्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष्याकडून स्पष्ट करण्यात आले. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून देवळीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली विकासाची दिशा असल्याचे नगराध्यक्ष ठाकरे म्हणाले तर आज देवळी नगर परिषदेच्या अर्थ संकल्पात विकासाच्या अनेक गोष्टी प्रस्तावीत केल्या असून महाराष्ट्र सरकार व आ. राजेश बकाने यांच्या सहकार्याने हा अर्थ सकल्प साकार होऊ शकतो, असे नप उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी सांगितले.