मुंबई,
Nilesh Sabale ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम मराठी मनोरंजन विश्वात एक अविस्मरणीय अध्याय ठरला. तब्बल दहा वर्षे हा शो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला, आणि निलेश साबळे यांनी लेखन तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत शोचे प्रमुख आकर्षण बनवले. या मंचावर मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलीवूड सुपरस्टार्सनेही हजेरी लावली होती. मात्र, दशकभरानंतर अचानक शो बंद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये धक्का बसला आणि विविध चर्चांना प्रचंड उधाण आले.
कार्यक्रम बंद झाल्यानंतर राशीभविष्यकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्यावर टीका केली, त्यावर निलेश यांनी ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी ‘हसताय ना… हसायलाच पाहिजे’ हा नवीन कार्यक्रम सुरू केला. या शोमध्ये ओंकार भोजने यानेही सहभाग घेतला, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यामुळे तो अल्पावधीतच बंद झाला.
अलीकडेच निलेश साबळे Nilesh Sabale यांनी सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लाल रंगाच्या सूटमध्ये खुर्चीवर बसलेला, चष्मा घातलेला आणि विचारमग्न अवस्थेत दिसणारा हा फोटो लक्षवेधी ठरला आहे. त्याने या फोटोला दिलेले कॅप्शन आहे, “नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!” या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चाहत्यांनी “आतुरता…”, “काहीतरी करा… आम्ही वाट पाहतोय”, “तुम्ही काय नवीन करणार आहात? लवकर सांगा” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत.याआधी २०२५ मध्ये निलेश साबळे Nilesh Sabale आणि भाऊ कदम यांनी ‘उगाच अवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते आणि तेव्हाही निलेश यांनी लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचे संकेत दिले होते. आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष त्यांच्या नवीन प्रोजेक्टवर लागले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे या आगामी प्रोजेक्टविषयी उत्सुकता वाढली आहे, आणि प्रेक्षकांसमोर निलेश साबळे पुन्हा कोणत्या नव्या स्वरूपात हजर होतील, हे पाहणे उत्सुकतेस्पद ठरणार आहे.
सध्या या पोस्टच्या माध्यमातून निलेश साबळे प्रेक्षकांना एक संकेत देत आहेत की, मनोरंजनाच्या रंगभूमीवर त्यांचे नवीन प्रयोग लवकरच पाहायला मिळणार आहेत, ज्यात हसवा-हसवीसह धमाल मनोरंजनाचा दुहेरी डोस मिळेल. त्यांच्या चाहत्यांना लवकरच नवा अनुभव पाहायला मिळणार असल्याची अपेक्षा आहे.