तालिबान कडाडला...पाकिस्तान भाडोत्री युद्ध लढतो

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
काबुल,
Pakistan fights a mercenary war अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अफगाण तालिबानमधील एका वरिष्ठ नेत्याने पाकिस्तानच्या लष्करावर आणि त्यांच्या प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष संवादात तालिबानचे वरिष्ठ अधिकारी आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे संचालक कारी सईद खोश्ती यांनी पाकिस्तानवर “भाडोत्री युद्ध” लढण्याचा आरोप करत म्हटले की, पाकिस्तानने आपल्या इतिहासात एकही युद्ध जिंकलेले नाही आणि प्रत्येक वेळी भारताकडून पराभव पत्करल्यानंतर तो अफगाण नागरिकांना लक्ष्य करतो.
 
 

Pakistan fights 
 
गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या अनेक लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्याचा दावा करण्यात आला. २२ फेब्रुवारी रोजी अफगाण नागरिकांवर झालेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही मोहीम राबवण्यात आल्याचे खोश्ती यांनी सांगितले. त्यांच्या मते, रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात सैनिक ठार झाले. काही भागांत हल्ला सुरू होताच पाकिस्तानी जवानांनी चौक्या सोडून माघार घेतल्याचाही दावा त्यांनी केला. डुरंड रेषेबाबत बोलताना खोश्ती यांनी ती सीमा अफगाणिस्तान मान्य करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते ही रेषा लादलेली असून अफगाण सैन्याने काही ठिकाणी पुढे सरकत पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवला आहे. काही सैनिकांना पकडल्याचाही त्यांनी दावा केला.
 
 
सप्टेंबरपासून पाकिस्तानी कारवायांमध्ये अफगाण नागरिकांचे मृत्यू झाल्याचा उल्लेख करत खोश्ती म्हणाले की, जर पाकिस्तानला आक्षेप असतील तर त्यांनी थेट सैन्याशी लढावे, निष्पाप नागरिकांवर हल्ले करणे हे शौर्य नव्हे. त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा भारताशी झालेल्या संघर्षांचा उल्लेख केला आणि प्रत्येक वेळी पराभवानंतर नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोप केला. जनरल असीम मुनीर यांच्याविषयी बोलताना खोश्ती यांनी त्यांच्यावर परकीय शक्तींच्या सूचनेवरून युद्ध छेडल्याचा आरोप केला. त्यांच्या मते पाकिस्तानने नेहमीच परकीय हितसंबंधांसाठी युद्धे लढली असून त्यातून देशांतर्गत अस्थिरता वाढली आहे. त्यांनी असा दावाही केला की प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला यासंदर्भातील पुरावे दिल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या घुसखोरीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खोश्ती यांनी सीमेवर उभारलेली काटेरी तार आणि मोठ्या प्रमाणावरील पाकिस्तानी सैन्याची उपस्थिती यामुळे असे दावे तथ्यहीन ठरतात, असे म्हटले. पाकिस्तान आपल्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी झाकण्यासाठी अफगाणिस्तानवर आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्तून आणि बलुच प्रदेशातील हिंसाचाराबाबत बोलताना त्यांनी तो पाकिस्तानमधील अंतर्गत धोरणांचा परिणाम असल्याचे सांगितले. आपल्या देशातील समस्यांसाठी शेजारी राष्ट्राला जबाबदार धरणे अन्याय्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला असून सीमाभागातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.