पुणे
Hinjewadi to Shivajinagar Metro हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवाशांसाठी आता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात थेट प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)कडून दोन्ही स्थानकांना जोडणाऱ्या १३८ मीटर लांबीच्या पादचारी पूलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत हिंजवडी मेट्रो सेवा शिवाजीनगरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून उभारण्यात येत आहे. या मार्गाचे अंतिम स्थानक जिल्हा न्यायालय परिसरात असून, येथे महामेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकात थेट प्रवेश मिळावा यासाठी चार मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारला जात आहे. पुलासाठी एकूण सहा कॉलम उभारण्यात येणार आहेत, त्यापैकी तीन कॉलमचे काम पूर्णत्वाकडे आहे आणि उर्वरित काम वेगाने सुरू आहे. पीएमआरडीएच्या माहितीप्रमाणे, पुढील तीन महिन्यांत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे.हा पादचारी पूल ‘पुणेरी मेट्रो’ (लाईन ३)ला जिल्हा न्यायालय स्थानकाशी जोडेल. दोन्ही स्थानकांच्या कॉन्कोर्स स्तरावरून प्रवाशांना थेट हालचाल करता येणार असून, त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रवास जलद आणि सुरक्षित होईल. शहरातील Hinjewadi to Shivajinagar Metro वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही हा दुवा महत्त्वाचा ठरणार आहे.पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिलपर्यंत या मार्गाची सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, शिवाजीनगर स्थानकाचे काही काम अद्याप अपूर्ण असल्याने अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा पादचारी पूल अत्यंत महत्त्वाचा ठरेल, ज्यामुळे शहरातील मेट्रो सेवा आणखी सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.