पुणे
Pune Municipal Corporation पुणे शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर भासत असल्याने पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार कोथरुड परिसरातील कैवल्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या मिळकतीवर कोटीभास्कर इन्फ्रा अँड डेव्हलपर्स प्रा. लि. या गृहनिर्माण प्रकल्पावर तात्काळ कामबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने दिलेल्या नोटिशीत नमूद केले आहे की, या प्रकल्पाला महापालिकेकडून सीसी/२१७४/२४, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती, मात्र अलीकडील पाहणीत बांधकामस्थळी वायुप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना न केल्याचे स्पष्ट झाले. एमपीसीबीच्या मार्गदर्शक सूचना पालिकेने सर्व बांधकाम प्रकल्पांना बंधनकारक केल्या आहेत, तरीही नियम पाळले गेले नाहीत, यामुळे महापालिकेने त्वरित कारवाई केली.
पुण्यात सध्या सुमारे १८ हजार Pune Municipal Corporation बांधकाम प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ निर्माण होत आहे. खोदाई, जड वाहतूक आणि इतर बांधकाम कार्यांमुळे नागरिकांना आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने नागरिकांच्या तक्रारीनंतर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, काही प्रकल्प नियमांचा पूर्णपणे भंग करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत २२० प्रकल्पांना कामे थांबविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यापैकी १९३ प्रकल्पांनी नियमांची पूर्तता केली असून त्यांची कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही २७ प्रकल्पांवर कामबंदीची नोटीस लागू आहे.आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, बांधकाम करताना नियम पाळले नाहीत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला गेला, तर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकल्पांना थेट कामबंदीचा सामना करावा लागू शकतो. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वायुप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक केल्या आहेत, आणि त्याचे पालन न करणाऱ्यांवर कटाक्षाने कारवाई केली जाईल.
पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे की, शहरात निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम कंपन्यांनी नियमांचे पालन करणे अपरिहार्य आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे इतर प्रकल्पांनाही सतर्कता येईल, अशी अपेक्षा प्रशासन व्यक्त करत आहे.