उबर एअरची सुरुवात; वाहतूक कोंडीतून मुक्तीचा मार्ग आकाशात

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
दुबई,
uber air शहरातील कोंडी आणि प्रवासाच्या त्रासाला आता आकाशातून उत्तर मिळणार आहे. उबरने जाहीर केले की, या वर्षाच्या अखेरीस दुबईमध्ये ‘Uber Air’ नावाची एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या सुविधेअंतर्गत प्रवासी थेट उबर ॲपवरून जोबी एव्हिएशनची ऑल-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी बुक करू शकतील. जेव्हा प्रवासी ॲपमध्ये आपले डेस्टिनेशन टाकतील, तेव्हा Uber Air चा पर्याय दिसेल. बुकिंग झाल्यावर उबरची कार प्रवाशांना घरून पिक-अप करून एअर टॅक्सी स्टँडपर्यंत पोहोचवेल. तिथून प्रवासी हवाई मार्गानं आपल्या गंतव्यस्थानी सुरक्षित आणि जलद पोहोचू शकतील.
 
 
uber air
 
शहरातील प्रवासाची पद्धत बदलणार
उबरचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर सचिन कंसल यांच्या मते, ‘ॲडव्हान्स्ड एअर मोबिलिटी’ शहरातील प्रवासाची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलू शकते. जोबी एव्हिएशनने सांगितले की, ही टॅक्सी पूर्णपणे विजेवर चालते, एका पायलटसह चार प्रवासी बसवता येऊ शकतात, आणि याचा कमाल वेग ताशी ३२० किमी आहे.
खास डिझाइन आणि सुरक्षितता
उबर एअरचे डिझाइन प्रवाशांना शांत आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी करण्यात आले आहे. आवाजाची पातळी अत्यंत कमी आहे आणि प्रवाशांना शहराचे सुंदर दृश्य पाहता यावे म्हणून मोठ्या खिडक्या दिल्या आहेत. कंपनीच्या मते, ८०,००० किलोमीटरहून अधिक उड्डाण करून ही टॅक्सी चाचणी पूर्णपणे सुरक्षित ठरली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही टॅक्सी १०० मैलांपर्यंतचे अंतर पार करू शकते.
जागतिक विस्ताराची योजना
आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, ही सेवा न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, युनायटेड किंगडम आणि जपान सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही सुरु होऊ शकते. अमेरिकेत सेवा सुरू करण्याअगोदर Federal Aviation Administration (FAA) ची मंजुरी आवश्यक असेल.
उबर आणि जोबी एव्हिएशन २०१९ पासून एकत्र काम करत आहेत, आणि २०२१ मध्ये जोबीने उबरच्या ‘Elevate’ विभागाचं अधिग्रहण केले.