काय आहे 'गजब लिल-हक'?रमजानमध्येच पाक-अफगाणमध्ये युद्ध!

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
इस्लामाबाद,
War in Pakistan-Afghanistan पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव उघड संघर्षात बदलल्याचे चित्र समोर येत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल तसेच कंधार आणि पक्तिया यांसारख्या शहरांवर हवाई कारवाया केल्याचा दावा केला आहे. इस्लामाबादकडून सांगण्यात आले की सीमावर्ती भागांवर आणि नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करण्यात येत आहे. पाकिस्तानने या मोहिमेला “गझब लिल-हक” असे नाव दिले असून त्याचा अर्थ न्यायासाठीचा संताप असा सांगितला जात आहे.
 

War in Pakistan-Afghanistan  
पाकिस्तानच्या मते, चित्राल, खैबर, मोहमंद, कुर्रम आणि बाजौर या भागांमध्ये अफगाणिस्तानकडून हल्ले झाले आणि त्यात नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्युत्तर देणे भाग पडल्याचे ते म्हणतात. पाकिस्तानने असा दावाही केला आहे की त्यांच्या कारवाईत अनेक तालिबानी ठार झाले, तर त्यांच्या बाजूने केवळ दोन सैनिकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून ५५ पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे परिस्थिती अधिकच गोंधळलेली आहे.
 
 
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे की अफगाणिस्तानातून नाटो सैन्याच्या माघारीनंतर शांततेची अपेक्षा होती; मात्र तालिबानने परिस्थिती बिघडवली. त्यांनी अफगाणिस्तान भारताच्या प्रभावाखाली गेल्याचा आरोपही केला. विशेष म्हणजे २०२१ मध्ये नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर पाकिस्तानने त्याचे स्वागत केले होते; मात्र सध्याच्या संघर्षात भारताचे नाव ओढण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने नांगरहार प्रांतातील तालिबानच्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करून तो नष्ट केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानच्या चौक्यांवर आणि सैन्यावर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. पवित्र रमजान महिन्यात दोन मुस्लिम देशांमध्ये सुरू झालेल्या या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत असून, परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली जात आहे.