दोन्ही अल्पवयीन नात्यातीलच
वर्धा,
समुद्रपूर तालुयातील कोरा येथे नात्यातीलच अल्पवयीन वर-वधूंचा Bal vivah बालविवाह होणार असल्याची माहिती चंद्रपूर येथील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला प्राप्त होताच त्यांनी वर्धा येथील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला याबाबतची सूचना दिली आणि वर्धा जिल्हा बाल विकास अधिकार्यांनी तत्काळ दखल घेत अधिकारी, पोलिस आणि अन्य अधिकारी थेट लग्नमंडपात धडकले. चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्याच्या समन्वयाने कोरा येथील बालविवाह उधळवून लावला. सोबतच वर-वधूच्या दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह रोखण्याबाबतचा जबाबनामा लिहून घेत समज दिली.
नात्यातच असलेल्या अल्पवयीन मुलांचा Bal vivah विवाह कोरा येथे २० रोजी होणार असल्याची माहिती चंद्रपूर येथील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला प्राप्त झाली होती. चंद्रपूर कक्षाने वर्धा येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांना याबाबतची माहिती दिली. कुरसंगे यांनी तत्काळ बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष स्मिता बढिये यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांच्या मार्गदर्शनात गिरड पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी वैशाली मिस्कीन, चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, समुपदेशक माधुरी शंभरकर यांनी सदर प्रकरणात कारवाई करतेवेळी पोलिस व ग्रामपंचायत अधिकारी तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी एच. बी. भोमले यांच्यासोबत समन्वय साधून बालविवाह थांबविण्यासाठी थेट लग्न मंडप गाठले.
घटनास्थळी पोहचल्यावर माहिती घेतली असता दोन्ही अल्पवयीन असल्याचे आढळून आले. यावेळी उपस्थित वर्हाडी व वधू-वरांच्या पालकांना Bal vivah बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याबाबतची माहिती देण्यात येऊन हा बालविवाह थांबविण्याबाबतच्या सूचना आशिष मोडक यांनी दिली. ग्रामपंचायत अधिकारी एच. बी. भोमले व सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा अंगणवाडी सेविका माया सोनावणे यांनी दोन्ही बालकांच्या पालकांकडून बालविवाह थांबविण्याबाबतचा जबाबनामा लिहून घेतला. तसेच पुढील कारवाईसाठी बालकांना बालकल्याण समिती, वर्धा यांच्या समक्ष हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी सदर बालविवाह थांबविण्याकरिता सक्षम अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जि. पी. पाटील, ग्रापं माजी सदस्य शिरीष पंदरे, शुभम भगत उपस्थित होते.