इस्रायलमधील भारतीयांसाठी सूचना जारी...

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Advice issued for Indians in Israel पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तरित्या इराणवर व्यापक हवाई कारवाई केल्यानंतर प्रदेशातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. राजधानी तेहरानसह विविध भागांतील सुमारे तीस ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. काही लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचीही वृत्ते समोर आली आहेत. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने कठोर प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले असून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात प्रहार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

teharamn 
 
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, सतत सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील कारवाईचे समर्थन करत अणु कार्यक्रम रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्याचे म्हटले आहे. इराणने प्रस्ताव नाकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. इस्रायलने या मोहिमेला “यहूदाची ढाल” असे नाव दिल्याचेही सांगितले जाते. इराणच्या अणुसुविधांवर लक्ष्य साधल्याच्या दाव्यांमुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियाकडे लागले असून पुढील काही दिवसांत संघर्षाची दिशा काय असेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.