बुलढाणा,
मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसमोर आज अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मराठीपणाची जाणिव हरवत चालली आहे. केवळ अनिवार्य म्हणून मराठी शिकवण्याची औपचारिकता पाळली जाते. मराठी भाषेचा खर्या अर्थाने गौरव करायचा असेल तर स्वतःचे मराठीपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत साहित्यिका Dr. Sangeeta Pawar प्रा. डॉ. संगीता पवार यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे बुलढाणा केंद्र व अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे स्थानिक इंटक सोसायटीच्या सभागृहात दि. २७ फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी सर्जेराव चव्हाण हे होते. जेष्ठ नाट्यकर्मी चंद्रशेखर केणे व बाळ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. नटराज पूजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कामगार कल्याण व अक्षरदेहतर्फे विद्या शिंदे , निलेश देशमुख, विजय सोनोने, अमोल कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल, मोत्याची माळ व पुष्प देवून सत्कार केला. कुसुमाग्रज व मराठी भाषा गौरव दिन या विषयावरील व्याख्यानात पुढे बोलताना Dr. Sangeeta Pawar प्रा. डॉ. संगीता पवार यांनी मराठी भाषेचा इतिहास व कुसुमाग्रजांचे साहित्याच्या माध्यमातून भाषिक योगदानाबद्दल सखोल व अभ्यासू विवेचन केले.
यावेळी जेष्ठ नाट्यकर्मी बाळ महाजन व चंद्रशेखर केणे यांनी बुलढाणा शहरातील नाट्य चळवळीचा समृध्द इतिहास सांगताना निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्यासह मराठीतील दिग्गज नाट्य कलावंतांनाही बुलढाण्याच्या नाट्य संस्कृतीचा विलक्षण आदर असायचा, अशी माहिती दिली. जेष्ठ कवी सर्जेराव चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून मराठी जगविण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी अक्षरदेह नाट्यकला संस्थेचे अध्यक्ष तथा नाट्य लेखक व कलावंत शशिकांत इंगळे यांनी त्यांच्या थियरी ऑफ कौशल्यायन या नाट्यसंहितेचे वाचन केले. नाट्य कलावंत गणेश राणे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कामगार कल्याण मंडळाच्या बुलढाणा केंद्र संचालिका विद्या शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नाट्य क्षेत्रातील विजय सोनोने, अमोल कुलकर्णी, दिनेश उचाडे पाटील, रविकिरण टाकळकर, अण्णासाहेब जाधव, तुषार काचकुरे, पवन बाबरेकर, शुभम गवई, मयुर परमार, योगेश जाधव, शैलेश बनसोड, अभिलाष चौबे, प्रा. शैलेश वारे, डॉ. दुर्गासिंग जाधव , डॉ. निलिमा जाधव, सविता सोनोने , कल्याणी साखरे, योगेश सोनुने, मंगेश जाधव, दत्तात्रय खाचणे, वल्लभ पाटील, चिन्मय राणे यांच्यासह नाट्य रसिक व साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पाटील, विलास मानवतकर, रुचिरा पाटील, सुरेखा इंगळे यांनी परीश्रम घेतले.