गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना 'लकी ड्रॉ'ची कार ठरली दुर्दैवी

- राज्यपालांच्या आदेशावरून प्रधान सचिव व विधि परामर्शी यांनी केली तत्काळ निलंबनाची कारवाई

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
गोंदिया,
lucky draw car शासनाची पूर्वपरवानगी न घेता लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेत चार चाकी वाहन जिंकणे गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त (परिविक्षाधीन) यांना चांगलेच भोवले असून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १२, १३ व १९ चा भंग केल्याच्या कारणावरून राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी यांनी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबनाची कारवाई केली आहे. तसे पत्रही शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.१० वाजता निर्गमित करण्यात आले आहे.
 

गोंदिया  
 
 
सविस्तर असे की, नागपूर येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्स तर्फे सोने खरेदीवर 'लकी ड्रॉ' योजना आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त (परिविक्षाधीन) दिशा पजई यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता आयोजित लकी ड्रॉ योजनेत सहभाग घेतला. योजनेनुसार लकी ड्रॉ मध्ये चार चाकी वाहन जिंकले व ज्वेलर्स तर्फे गोंदिया येथे नवीन प्रतिष्ठानच्या उद्घाटनाप्रसंगी सदर चारचाकी वाहनाचे स्विकारही केले.lucky draw car यावर राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी दिलीप शिवाजीराव घुमरे यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन पजई यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करुन त्यांना निलंबित केले. त्याचबरोबर हे आदेश अंमलात असेपर्यंतच्या कालावधीत त्यांना गोंदिया येथे मुख्यालय देण्यात आले असून निम्न स्वाक्षरीत व्यक्तीच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
...तर निर्वाह भत्ताही जाणार...
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ च्या तरतूदी लक्षात घेता, पजई यांना निलंबित असताना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय राहणार नसल्याचे नमूद केले आहे. निलंबित असताना खासगी नोकरी स्विकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास त्यांना गैरवर्तणूकीसाठी दोषी समजण्यात येऊन उचित कार्यवाही करण्यात येईल. तसेच अशा बाबतीत निर्वाह भत्त्यावर त्यांचा हक्क राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
....