तेल अवीव,
Israeli airstrikes on Iran पश्चिम आशियात तणावाचे वातावरण अधिकच तीव्र झाले असून इस्रायलने इराणवर व्यापक हवाई कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान इराणमधील सुमारे तीस ठिकाणांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त असून राजधानी तेहरानसह अनेक भागांत भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटांनंतर काही परिसरांत आगीच्या ज्वाला आणि धुराचे ढग दिसल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या घडामोडींनंतर इराणमध्येच नव्हे तर इस्रायलमध्येही इशारा देणाऱ्या सायरनचा आवाज घुमला. संभाव्य प्रत्युत्तराच्या भीतीमुळे संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. इस्रायली लष्कराने नागरिकांना संरक्षित स्थळांच्या जवळच राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.

ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु विषयक चर्चेत कोणतीही ठोस प्रगती झालेली नव्हती. अमेरिकेची भूमिका अशी आहे की इराणने अण्वस्त्र निर्मिती रोखावी आणि युरेनियम शुद्धीकरण थांबवावे. मात्र इराणने आपला अणु कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचा दावा कायम ठेवत शुद्धीकरण थांबवण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर तणाव वाढत गेला आणि अखेर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणविरुद्ध कठोर भूमिका घेत सातत्याने इशारे दिले होते. त्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई घडल्याची चर्चा आहे. इराणमधील काही प्रमुख वृत्तसंस्थांनीही हल्ल्याची पुष्टी करत संबंधित दृश्ये प्रसारित केली आहेत. इस्रायलमध्ये परिस्थिती सतर्कतेची ठेवण्यात आली असून शैक्षणिक उपक्रम, सार्वजनिक कार्यक्रम आणि अनावश्यक हालचालींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. लष्कराने नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या ताज्या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.