मनपा आमसभेत स्वच्छता कंत्राटावरून घमासान

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
अटी व शर्तींमध्ये बदल करण्याची मागणी
 
अमरावती, 
शहरातील स्वच्छता व त्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटावर चर्चा करण्यासाठी Mayor Srichand Tejwani महापौर श्रीचंद तेजवानी यांनी विशेष आमसभा शनिवारी बोलवली होती. या आमसभेत दिवसभर नगरसेवक व प्रशासनात घमासान चर्चा झाली. कंत्राटदारासोबत झालेल्या करारातल्या अटी व शर्ती बदलण्याची मागणी एकमुखाने सभागृहात करण्यात आली. उपमहापौर सचिन भेंडे, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, नगरसचिव वडुरकर सभापती तेजवानी यांच्यासोबत सभामंचावर होते. गेल्या चार वर्षातले प्रशासकराज शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने फारच अडचणीचे ठरले, अशी सार्वत्रिक ओरड होती. महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर नवीन सदस्य स्थितीत सुधारणा करतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
 
 
mahapor
 
त्याच अपेक्षेची पुर्तता करण्यासाठी फक्त स्वच्छता या विषयावर सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. या सभेत जवळपास बहुतांश नगरसेकवांनी आपआपल्या प्रभागातल्या स्वच्छता विषयक समस्या मांडल्या. संबंधित अधिकार्‍यांकडून न मिळणार्‍या प्रतिसादाचे अनेक किस्से सभागृहात सदस्यांनी सांगितले. त्यावर हशा देखील पिकला. स्वच्छता विभागातले अधिकारी व कर्मचारी कसा भेदभाव करतात याकडे सभागृहाचे लक्षवेधले. विशेष करून नवीन महिला नगरसेविकांनी त्यांना आलेले कटु अनुभव बिनधास्तपणे सभागृहात मांडले. सदस्यांचा सर्वाधिक रोष स्वच्छता अधिकारी जाधव व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्यावर होता. हे दोन्ही अधिकारी अजिबात सहकार्य करीत नसल्याचे अनेकांचे म्हणने होते.
 
 
Mayor Srichand Tejwani  नव्याने कोर्णाक कंपनीला देण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाच्या करारनाम्यावरून अनुभवी नगरसेवकांनी मुद्देसुद ताशेरे ओढले. जो करार झाला आहे, त्यातून मनपाची अर्थिक लुट होणार असल्याचे मिलिंद चिमोटे यांनी पुराव्यानिशी सांगितले. या करारात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यातच आल्या नसल्याचे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले. किरोकळ वाटणार्‍या पण जतनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या बाबी या करारनाम्यात असायला हव्या, असे त्यांनी आवर्जून नमुद केले. करारनाम्यात बदल करण्याचा अधिकारी आमसभेला आहे. ही सभाच सर्वोच्च असल्याने जनतेसाठी आवश्यक निर्णय घेऊन करारनाम्यात बदल करण्याची मागणी त्यांनी केली. याच पद्धतीने इतरही सदस्यांनी मुद्दे मांडले. सभागृह नेता चेतन गांवडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, बबलू शेखावत, डॉ. राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, अनिल अग्रवाल, बंडू हिवसे, डॉ. स्मिता सूर्यवंशी, ममता आवारे, स्वाती कुळकर्णी, राधा कुरील, मंगेश मनोहरे, मनीष बजाज, प्रा. संजय शिरभाते, नंदा सावदे, लता देशमुख यांच्यासह अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. वृत्तलिहेस्तोवर सभा सुरूच होती.