बनावट मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे पीएमपीची फसवणूक

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
पुणे
PMPML fraud पुणे शहरात बनावट कागदपत्रांसह फेक मोबाइल ॲप्लिकेशन्स तयार करून प्रवास फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. यातीलच एक घटना पीएमपीच्या दैनंदिन पासच्या संदर्भात समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय २४, रा. प्रीतम हाइट्स, बालाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 

Pune news, PMPML fraud 
या प्रकरणात पीएमपीएमएलकडून मिठ्ठू साहेबराव बडे (वय ४५, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी रोज भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉप येथून पीएमपी बसद्वारे प्रवास करत असे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याने मिठ्ठू बडे यांना आपल्या मोबाइलवरील दैनंदिन पास दाखविला. पास पाहून त्यांना शंका उत्पन्न झाली.
शंकेची खात्री करण्यासाठी त्यांनी पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधला असता, हा पास बनावट असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या तपासात समोर आले की, कौस्तुभ मांजरेकर यांनी स्वतःच्या व इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी पीएमपीच्या मूळ ॲप्लिकेशनसारखेच दिसणारे बनावट मोबाइल ॲप तयार केले होते. त्यामध्ये ७० रुपयांचा खोटा दैनंदिन पास तयार करून अधिकृत पासधारक असल्याचा भास निर्माण केला.
या पासचा वापर करून कौस्तुभ मांजरेकर यांनी पुणे शहरात प्रवास करत पीएमपीस मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकरणी तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई केली असून, पुढील तपास अद्याप सुरू असल्याचे सांगितले आहे.