एनसीएमसी कार्डाची अनिवार्यता केवळ एक अफवा

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
एसटीच्या सवलती पूर्ववत मिळणार
 
तिवसा, 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) NCMC Card (एसटी) मार्फत सवलतीच्या तिकिटांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी ) अनिवार्य करण्यात येणार असल्याचा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर तिवसा शहर व तालुक्यात प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्‍या प्रवाशांमध्ये या बातमीमुळे चिंता पसरली होती; मात्र, एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी ही केवळ अफवा असल्याचे जाहीर करताच नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 
 
tivasa
 
व्हायरल संदेशात एसटीने रोख व्यवहार बंद करून (ST) NCMC Card  एनसीएमसी स्मार्ट कार्डद्वारेच सवलतीची तिकिटे देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. कार्ड काढण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल, तसेच त्यामध्ये रक्कम रिचार्ज करूनच पुढील प्रवास करता येईल, असेही नमूद करण्यात आले होते. या पृष्ठभूमीवर अनेक लाभार्थ्यांनी तिवसा बसस्थानक गाठून अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी गर्दी केली. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत एसटी महामंडळाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, सध्या सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर फिरणारा दावा खोटा असून तो जनतेची दिशाभूल करणारा आहे. महामंडळाकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, महसूल व्यवस्थापन सुलभ करणे, सवलतींचा गैरवापर रोखणे आणि प्रवाशांना जलद सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने आधुनिक प्रणालीचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र कोणतीही सक्ती करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
 
 
दरम्यान, अफवांमुळे तिवसा बसस्थानक कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचारी वर्गालाही सतत येणार्‍या चौकशीमुळे अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागला. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवासी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन माहिती घेत असल्याचे चित्र दिसून आले. एसटी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही अधिकृत घोषणा येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत प्रसिद्धीपत्रक किंवा अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीलाच महत्त्व द्यावे.
 
‘ती’ बातमी पूर्णपणे खोटी
-एक मार्चपासून एसटीची सवलत तिकिटे बंद होणार असल्याचे कोणतेही परिपत्रक शासनाकडून आलेले नाही. सोशल मीडियावर फिरणारी ही बातमी पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. (ST) NCMC Card एनसीएमसी कार्ड हे पारदर्शक व डिजिटल प्रवासासाठी उपयुक्त असले तरी सध्या ते काढण्याबाबत कोणतीही सक्ती किंवा मुदत निश्चित केलेली नाही. प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.
-प्रतिक मोहोड
बस स्थानक प्रमुख, तिवसा