वाघाच्या हल्ल्यात कापूस तोडायला गेलेल्या महिलेचा मृत्यू

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
नागरिकांचा मृतदेह उचलण्यास नकार
सोमनाथ येथील आमटे फार्ममधील घटना

मूल, 
तालुक्यातील सोमनाथ येथील आमटे फार्ममध्ये कापूस तोडण्यासाठी गेलेल्या मारोडा येथील एका महिलेवर वाघाने बफर वनपरीक्षेत्रात हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. सुनीता शामराव भोयर (45, रा. मारोडा) असे मृतक महिलेचे नाव आहे. सुनीता भोयर या सकाळी 7 वाजता इतर मजुरांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या. कापूस तोडत असताना शेतीच्या कडेला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या tiger attack वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला. यावेळी शेतात उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी आरडाओरडा केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला. मात्र, तोपर्यंत सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला होता.
 
 
tiger dks
 
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बफरझोन मूलचे वनपरीक्षेत्राधिकारी रामचंद्र शेंडे यांच्या चमुने मृत महिलेचा पंचनामा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले व वनविभागाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. घटनास्थळावरून मृत महिलेचे प्रेत दुपारी 1.30 वाजेपर्यंत नागरिकांनी उचलू दिले नाही. यामुळे घटनास्थळावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, वनविभागाने नागरिकांच्या मागण्या मान्य केल्यामुळे तणाव शांत झाला. tiger attack  वाघाने महिलेवर हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वनविभाने घटनास्थळी वाघाला पकडण्यासाठी गस्तपथक लावण्याचे मान्य केले. मृत महिला ही अविवाहित होती. तिच्या पश्चात म्हातारे आई-वडील व कुटुंबीय असा परिवार आहे. वनविभागाने मृत महिलेच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. घटनेचा पुढील तपास मूल वनविभाग बफरझोनचे वनपरीक्षेत्राधिकारी रामचंद्र शेंडे व मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड करीत आहेत.