वर्धा युथ फेस्टला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
 नव्यांना मिळाले व्यासपीठ
 
वर्धा, 
Wardha Youth Fest 2026 वर्धा युथ फेस्ट २०२६ च्या यशस्वी आयोजनामुळे वर्धा जिल्ह्यातील युवकांमध्ये देशभक्ती, नेतृत्व कौशल्य आणि राष्ट्रीय जबाबदारीची अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली आहे. हा महोत्सव युवक चळवळींसाठी एक नवा आदर्श ठरत आहे. तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वर्धेतील सुमारे २७ विविध शालेय व विद्यालयीन संस्थेतील विद्यार्थ्यांबरोबरच हजारो नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
 
 
youth
 
वर्धेतील युवकांसाठी सामाजिक कार्य करणार्‍या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या वर्धा युथ फेस्ट या महोत्सवात शाळा, महाविद्यालये, एनसीसी कॅडेट्स आणि स्थानिक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शारीरिक क्षमता, नेतृत्व कौशल्य आणि राष्ट्र भक्तीचा संगम असलेला हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरला. केंद्रीय दारुगोळा भंडार पुलगाव च्या वतीने आयोजित करण्यात आलेली हू डेअर्स विन ही लष्करी आव्हानात्मक स्पर्धा व भारतीय वायुसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एरो मॉडेलिंग आणि ड्रोन प्रात्यक्षिक हा वर्धा युथ फेस्ट मधील सर्वात आकर्षक उपक्रम ठरला. भारतीय सशस्त्र दलातील कठोर प्रशिक्षणाची अनुभूती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या स्पर्धेचा उद्देश युवकांना शिस्त, धैर्य आणि संरक्षण सेवेकडे प्रेरित करणे हा होता.
 
 
Wardha Youth Fest 2026  महोत्सवाचे उद्घाटन भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरित महासंचालक डॉ. अलोक त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी वर्धा व मुख्य कार्यकारी अधिकारी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाला सेंट्रल अ‍ॅम्युनिशन डेपोचे कमांडर ब्रिगेडियर प्रशांत कुमार, एनसीसी विदर्भ नागपूर विभागाचे प्रमुख ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास, भारतीय वायुदलाचे स्क्वाड्रन लीडर विकास कुमार आणि विंग कमांडर व्ही. दीपिका राव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी व उत्स्फूर्त मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय सेना व वायुदलामध्ये भरती होण्यासाठी आवश्यक तयारी व करिअर मार्गदर्शनाची सविस्तर माहिती दिली. उद्योजकतेवर जनजागृती करणार्‍या जागृती यात्रेचे कार्यकारी अध्यक्ष आशुतोष कुमार यांनी युवकांना उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
 
 
युथ पार्लमेंट या मंचावर जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील युवकांनी राष्ट्रीय मुद्दे, लोकशाही व्यवस्था आणि शासन प्रणालीवर आपले विचार मांडले. वर्धाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमातून जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून हा संपूर्ण महोत्सव हजारो युवकांपर्यंत ऑनलाईन पोहोचविण्यात आला. भविष्यातील नेते, सैनिक, नवोपक्रमक आणि जबाबदार नागरिक घडवणे हे आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन युथ पीस फाउंडेशनचे अध्यक्ष व वर्धा युथ फेस्टचे संस्थापक सारंग रघाटाटे यांनी केले. या उपक्रमाला पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने यांनी शुभेच्छा दिल्या.
 
 
Wardha Youth Fest 2026  आयोजन समितीच्या वतीने वर्धा युथ फेस्ट ला भविष्यात राज्यस्तरीय व राष्ट्रीय युवक नेतृत्व मंच म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली. देशरक्षण जागृती, उद्योजकता आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यासारख्या विषयांचा समावेश करून हा महोत्सव आणखी व्यापक स्तरावर आयोजित करण्याचे आश्वासन देखील यावेळी समितीच्या वतीने देण्यात आले. विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी फेस्टिव्हल समितीच्या सुमारे १२४ युवक युवतींनी यशस्वीरीत्या पार पाडली.