भारताने आज वेस्ट इंडिजवर विजय मिळवला तर उपांत्य फेरीत कोणाशी सामना?

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
कोलकाता, 
india-vs-west-indies आज कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वीस षटकांच्या विश्वचषक २०२६ स्पर्धेतील अत्यंत निर्णायक सामना रंगणार आहे. संध्याकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
 
india-vs-west-indies
 
या टप्प्यावर उपांत्य फेरीतील संभाव्य चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. दुसऱ्या गटात इंग्लंड संघाने सुपर आठमधील तिन्ही सामने जिंकत सहा गुणांसह अव्वल स्थान निश्चित केले आहे. india-vs-west-indies न्यूझीलंड संघाने एक विजय आणि पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यातून मिळालेल्या गुणासह एकूण तीन गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे या गटातील उपांत्य फेरीसाठीचे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या गटात भारताचा समावेश असून दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत चार गुणांसह आघाडी घेतली आहे. त्यांचा तिसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. सध्याच्या स्थितीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थान राखण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या धावगतीमुळे ते पहिल्या क्रमांकावर कायम राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भारताने आजचा सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली तर तो गटात दुसऱ्या क्रमांकावर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार एका गटातील अव्वल संघाचा सामना दुसऱ्या गटातील उपविजेत्या संघाशी होतो. त्या अनुषंगाने भारत उपांत्य फेरीत पोहोचल्यास त्याचा सामना इंग्लंडशी होऊ शकतो. india-vs-west-indies अंतिम चित्र आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. भारताऐवजी वेस्ट इंडिजने उपांत्य फेरी गाठली तरी त्यांच्यासमोरही इंग्लंडचेच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीचे सामनेही निश्चित झाले आहेत. पहिला उपांत्य सामना ४ मार्च रोजी पुन्हा ईडन गार्डन्स येथे होणार आहे, तर दुसरा सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवले तर तो दुसऱ्या उपांत्य सामन्यात उतरेल आणि ५ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरू शकतो. मात्र आजच्या लढतीचा निकालच या सर्व समीकरणांना अंतिम रूप देणार आहे.