चंद्रपूर,
kidnapped-child-found : बल्लारपूरतील रेल्वे परिसरातल्या एका शेडमधून 3 वर्षाच्या बालकाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून 7 वेगवेगळी पथके बालकाच्या शोधार्थ पाठविली. त्यानंतर 20 तासात अपहरण केलेल्या बालकाचा शोध घेवून त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी बालकाच्या आईने बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, त्या व त्यांचे पती हे बल्लारपूर रेल्वे स्थानक परिसरात राहत असून, त्या परीसरात कचरा गोळा करून त्याव्दारे आपली उपजिविका चालवतात. 27 फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचा 3 वर्षाचा मुलगा परिवारासह बल्लारपूर रेल्वे स्थानकासमोरील खुल्या पटांगणाच्या एका शेडमध्ये झोपले असता, रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलाचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी 323/2026 कलम 137 (2) अन्वये गुन्हा नोंद केला होता.
या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तपासात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिस ठाण्याची 7 वेगवेगळी पथके गठित केली. 100 हून अधिक सिसिटिव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे व एका स्थानिक नागरिकाच्या सतर्कतेमुळे आरोपी तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे असल्याचे कळले. त्यानुसार पथके रवाना करण्यात आली.
मंचेरियल येथील आरोपी ऐलक्का रायसिंग बुद्दे, राणी विनोद पसनोटी, संगिता व्यंकटेश पानंगणती व इतर 2 पुरुष यांनी बल्लारपूर रेल्वेस्थानक येथे येवून मुलावर पाळत ठेवली व त्या मुलाचे आई-वडील झोपले असताना, त्या मुलाचे अपहरण करून एका चारचाकी वाहनात विक्री करण्यासाठी घेवून गेले. या 3 वर्षाच्या मुलास आरोपींनी सातक्का चंद्रया करेरे, लावण्या कुमारस्वामी कोणा यांना 3 लाख 50 हजार रुपयात विकले होते.
या पाचही आरोपी महिलांना मंचेरियल येथील स्थानिक पोलिसांची मदत घेवून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात असलेले दोन पुरूषांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून मुलास ताब्यात घेवून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाची चोरी करून त्याची विक्री करणार्या टोळीने आणखी काही ठिकाणी अश्याच प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत तपास सुरु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार, पोलिस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, विक्की लोखंडे, सुनील गौरकार, संतोष दांडेकर आदींनी केली.