प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे

प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी तर्फे अनुभवात्मक शिक्षणाची अनोखी संधी

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
विधी शर्मा
नागपूर,
PRSSE Nagpur विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे, या ध्येयवाक्याला अनुसरून कार्य करणाऱ्या प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएसई) या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक आणि संशोधनाधिष्ठित शिक्षणाची प्रभावी वाट उघडली आहे. 'तरुण भारत'शी विशेष संवाद साधताना पीआरएसएसईच्या संचालिका डॉ. सीमा उबाळे यांनी सांगितले की, २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या उपक्रमात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, गणित तसेच डिझाइन थिंकिंग या शाखांमध्ये प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे विद्यार्थी शिक्षण घेतात.
 

Prof. Rajendra Singh Science Exploratory, PRSSE Nagpur 
अलाहाबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या) यांच्या प्रेरणेतून ही एक्सप्लोरेटरी कार्यरत आहे. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा वारसा जपत पीआरएसएसई विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करत असल्याचेही डॉ. सीमा यांनी सांगितले.
संस्थेच्या शिक्षण पद्धतीबद्दल PRSSE Nagpur बोलताना पारंपरिक प्रयोगांपेक्षा वेगळ्या पद्धतीने, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, गंभीर विचार करण्यास आणि खुल्या तपास प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे हा पीआरएसएसईचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. इथे विद्यार्थी यामुळे वैज्ञानिक संकल्पनांची सखोल समज आणि चौकस वृत्ती विकसित होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने वैज्ञानिक साक्षरता, समीक्षात्मक विचार आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरची प्रेरणा देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. वर्षभर चालणारा प्रयोगशाळा प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः ६ वी ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी असून, आठवड्यातून एकदा अत्याधुनिक प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव दिला जातो. याशिवाय, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा तसेच इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिंपियाड अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जातात. तज्ज्ञांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर व्हावा यासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन, भौतिकशास्त्रज्ञ एच. सी. वर्मा यांच्यासारखे देशातील नामवंत विज्ञान शिक्षक व तज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र देखील आयोजित केले जातात.