पुणे
OBD device car hacking शहरात कार चोरीच्या घटनांनी चिंताजनक वळण घेतले असून आता पारंपारिक पद्धतीऐवजी ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून गाड्या पळवल्या जात आहेत. आधुनिक उपकरणांच्या मदतीने कारला कोणतीही बाह्य इजा न पोहोचवता थेट सॉफ्टवेअर हॅक करून चोरी केल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुणे पोलिसांसमोर या टोळ्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, चोरटे दिल्ली किंवा चीनच्या बाजारपेठेत सहज उपलब्ध होणाऱ्या OBD (On-Board Diagnostics) डिव्हाइस आणि रिलेबॉक्सचा वापर करत आहेत. लॅपटॉप आणि विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कारचा इंजिन कोड स्कॅन केला जातो. त्यानंतर OBD डिव्हाइस कारला जोडून संपूर्ण इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवला जातो. सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश मिळताच गाडीतील OBD device car hacking सेन्सर आणि जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली निष्क्रिय केली जाते, ज्यामुळे वाहनाचा मागोवा घेणे कठीण होते.विशेषतः स्मार्ट की आणि सेन्सर लॉक प्रणाली असलेल्या आधुनिक गाड्या या टोळ्यांच्या निशाण्यावर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अनेक वाहनचालक गाडी अनधिकृत ठिकाणी पार्क करणे किंवा घाईत खिडक्या पूर्ण बंद न करणे अशा छोट्या चुका करतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे.पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाडी सुरक्षित आणि अधिकृत पार्किंगमध्येच उभी करावी, अँटी-थेफ्ट उपकरणांचा वापर करावा तसेच वाहनाच्या सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या ‘हायटेक’ चोरीच्या घटनांमुळे शहरात वाहन सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.