अंनिसचा लोकजागर स्मशान होलिकोत्सव

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Smashan Holi Festival अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखेच्या वतीने सोमवार २ रोजी तिसावा लोकजागर स्मशान होलिकोत्सव आयोजित करण्यात आला असून यावर्षी पुन्हा एकदा गीतकार, शायर तथा चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची काव्यमैफल सायंकाळी ७ वाजता स्मशानभूमीत रंगणार आहे.
 

Wardha, Lokjagar, Smashan Holi Festival, 
 
 
यापूर्वी या होलिकोत्सवात सखे साजणी सादर करणार्‍या ज्ञानेश वाकुडकर यांचा यावर्षी फक्त वाकुडकर हा नवनिर्मित कार्यक्रम सादर होणार आहे. प्रा. वाकुडकर यांचे अंगार आणि शृंगार, चमच्यांचे संमेलन, फत तुझ्यासाठी, सखेसाजणी आदी काव्यसंग्रह, वंदे मातरम्, कुर्यात सदा मंगलम् नाट्यकृती, तिची कहाणी ही कादंबरी तसेच गांधी गोडसे फिफ्टी फिफ्टी, समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत आदी ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांच्या कवितेचा चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. वाकुडकरांनी चित्रपट निर्मितीही केली असून त्यांनी गार्गी, तेरवं, दलम, आनंदाचे डोही, यमाच्या गावाला जाऊ या, जहर खाऊ नका आदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.
समाजमनातून भूतप्रेतांची अवास्तव भीती आणि स्मशानाबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन दूर सारण्यासाठी एकोणतीस वर्षांपूर्वी अ. भा. अंनिसद्वारे वर्ध्यात लोकजागर होलिकोत्सव सुरू करण्यात आला. प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घातल्या जाते. वर्धानगरीची ओळख असलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सुजाण नागरिकांनी, युवक युवतींनी मित्रपरिवारासह सहभागी होण्याचे आवाहन अ. भा. अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर व आयोजनकांनी केले आहे.