भारतीय संस्कृतीच्या संरक्षणासाठी समाज एकजूट होणे काळाची गरज

- अ‍ॅड. अश्विनीकुमार उपाध्याय ः रामनगर येथे विराट हिंदू सम्मेलनाचा समारोप

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
ashwini-kumar-upadhyay : भारताची ओळख ही सनातन संस्कृती, परंपरा आणि मूल्यांमुळे आहे. या परंपरांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. समाजातील तरुणांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता, प्रख्यात वक्ते व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले. देशात धर्माची जय आणि अधर्माचा नाश व्हावा यासाठी इंग्रजकालीन कालबाह्य कायदे बदलणे आवश्यक असल्याचे सांगून भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीच्या संरक्षणासाठी समाज एकजूट होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड उपाध्याय यांनी केले.
 

ashwini-kumar-upadhyay 
 
 
 
येथील रामनगर येथे सकल हिंदू समाज रामनगर परिवारच्या वतीने ९ मार्च रोजी आयोजित विराट हिंदू सम्मेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी सम्मेलनाला राष्ट्रीय संतसभा प्रतिनिधी पुरी येथील आचार्य शशिभूषण मोहंती, धावपटू मुन्नालाल यादव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक दलजीतसिंग खालसा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भव्य कलशयात्रा आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत रामनगर परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. धार्मिक घोषणांनी आणि देशभक्तीच्या वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. समारोप प्रसंगी भारतमाता आरती, सामूहिक हनुमान चालीसा पठण तसेच ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले.
 
 
 
यावेळी वीर बलिदानी छत्रपती संभाजी महाराज यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन माधव गारसे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गिरधर, संतोष पाठक, आशुतोष शर्मा, स्नेहल पटेल, अजय यादव, वसंत राठोड, उमेश फुलबांधे, तुषार घडोले, हर्षवर्धन जायसवाल, रामू ढोरे, राजेश पर्वतकर, राकेश चौहान, शैलेन्द्र सिंह राणा, जलाराम गंभीर, प्रीतम मेश्राम, अमित यादव, नरेंद्र फुलबांधे, पवन यादव, मदन गाडे, गणेश शेंडे, वंदना पाठक, भारती पर्वतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.