पश्चिम बंगाल सरकारच्या कंत्राटाचे आमिष,

नागपुरातील व्यावसायिकाची १.१३ कोटींची फसवणूक

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur news पश्चिम बंगाल सरकारकडून शालेय बॅग व युनिफॉर्म पुरवठ्याचा मोठा ठेका मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वर्धमाननगर येथील हनीसागर अपार्टमेंटमध्ये राहणारे निरंज नटवरलाल खेमका (३७) हे पेपर ट्रेडिंग, नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायर्सचा व्यवसाय करतात. त्यांचे परिचित संजय शर्मा (रा. पश्चिम बंगाल) यांनी त्यांना फोन करून पश्चिम बंगाल सरकारकडून शाळेच्या बॅग आणि युनिफॉर्म पुरवठ्याचा मोठा ऑर्डर निघाल्याची माहिती दिली. हे कंत्राट घेण्याची तयारी आहे का, अशी विचारणा केल्यावर खेमका यांनी त्यास होकार दिला.
 
 

fraud  
 
 
 
यानंतर खेमका हे पश्चिम बंगाल येथे गेले असता त्यांची ओळख शेख अजमीर हुसेन (चोवीस परगणा, टीआर अली चाकलखीपूर, पश्चिम बंगाल) व सुभाषित अनिलकुमार सिन्हा (बीरकुंत मार्ग, ग्रीन प्लाझा, सीकमराठी, पश्चिम बंगाल) यांच्यासोबत करून दिली. सुभाषीत सिन्हा याने स्वतःला पश्चिम बंगाल सरकारमधील मोठा अधिकारी असल्याचे सांगून शालेय युनिफॉर्म आणि बॅग पुरवठ्याचा कंत्राट देण्याचा अधिकार आपल्या हातात असल्याचा दावा केला. आरोपींनी खेमका यांचा विश्वास संपादन करत त्यांनाच हा कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवले.nagpur news त्यासाठी सुरुवातीला २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास लकडगंज परिसरातील टेलिफोन एक्स्चेंज चौकातील कर्नाटक बँकेच्या शाखेतील खात्यातून शेखच्या ‘आईस इंटरप्रायझेस’ या फर्मच्या खात्यात प्रोसेसिंग फी म्हणून ७ लाख रुपये पाठविले. यानंतर पुढील सहा महिन्यांत पश्चिम बंगाल सरकारसोबत करार करून दिल्याचे भासवून आरोपींनी खेमका यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम मागितली. विश्वास ठेवून खेमका यांनी आरोपींना ऑनलाइन पद्धतीने एकूण १.१३ कोटी रुपये पाठविले. मात्र बराच काळ लोटल्यानंतरही त्यांच्या नावावर कोणतेही टेंडर निघाले नाही. त्यामुळे खेमका यांनी पश्चिम बंगाल येथे जाऊन आरोपींची भेट घेतली असता त्यांनी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ सुरू ठेवली. यामुळे संशय आल्याने खेमका यांनी चौकशी केली असता आरोपींपैकी कोणीही पश्चिम बंगाल सरकारमध्ये अधिकारी नसल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेमका यांनी तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.