देवळीत ‘दालना’वरून राजकीय ठिंणगी; पत्र युुद्ध सुरू!

नगराध्यक्षांच्या पत्रावर उपाध्यक्षांची पत्रकार परिषद

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
देवळी,
deoli-municipal-council : देवळी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सुरू असलेले कार्यालयीन कामकाज तळमजल्यावर आणण्याच्या मुद्यावरून नगरपरिषदेत वाद निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी १० रोजी मुख्याधिकारी नेहा आकोडे यांना पत्र देत १५ दिवसांत कार्यालय तळमजल्यावर न आणल्यास बाहेर बसून कामकाज करण्याचा इशारा दिला आहे. या पत्राच्या पृष्ठभूमीवर नप उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी आज बुधवार ११ रोजी सकाळी नपत पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांच्या भूमिकेवर चोपडा यांनी टीका केली.
 
 

 dff 
 
 
 
पत्रकारांसोबत बोलताना नगर पालिका उपाध्यक्ष चोपाडा म्हणाले की, नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १७ फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी १५ जून २०१९ च्या ठराव क्रमांक १० नुसार केलेल्या निर्णयाचा अवमान न करता प्रशासकीय कार्यालय पहिल्या माळ्यावरच ठेवण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. त्यावेळी नगराध्यक्ष ठाकरे सुद्धा सभागृहात होते.
 
 
वयोवृद्ध, दिव्यांग नागरिकांना वरच्या मजल्यावर येण्यास त्रास होऊ नये यासाठी नगरपरिषद इमारतीत लिफ्ट बसवण्यात येणार यावर एकमत झाले होते. मात्र, आता त्याच विषयावर नगराध्यक्ष ठाकरे यांनी मुख्याधिकार्‍यांना पत्र देत कामकाज तळमजल्यावर आणण्याची मागणी करणे हे सभागृहाच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचे चोपडा म्हणाले. नगराध्यक्षांनी दिलेले पत्र मुख्याधिकार्‍यांना धमकावणारे असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहाने सर्वानुमते ठराव घेतल्यानंतर अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्षांनी समन्वय साधने आवश्यक असल्याचे चोपडा यांनी नमूद केले.
 
 
दिव्यांग महिला व वृद्धांना कार्यालयात येताना त्रास होऊ नये व नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच लिफ्टची व्यवस्था करण्याबाबत एकमत आहे. नगरपरिषद निधीची स्थिती सध्या समाधानकारक नसल्यामुळे लिफ्ट बसविन्या साठी दोन महिन्यांत आ. राजेश बकाने यांच्या स्थानिक विकास निधीतून १८ लाख रुपये खर्च करून नगरपरिषद इमारतीत लिफ्ट बसवण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारी २०२६ ला सभागृहात घेतलेल्या बहुमताच्या निर्णयानुसार नगरपरिषदेचे कामकाज पहिल्या मजल्यावरच सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते राजकीय स्टंट करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला विलास जोशी, मनीषा लोखंडे, विभावरी बजाईत, शितल तरेकर, विजय गोमासे, प्रेमेन्द्र ढोक, संतोष भोयर, रविंद्र करोटकर, माजी उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर आदी उपस्थित होते.