एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, एसआयटीकडून होणार चौकशी

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
मुंबई
Eknath Khadse माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात विशेष तपास समिती (एसआयटी) नेमण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी ६ विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांसह नऊ गावांतील जमिनींच्या खरेदी आणि मोबदला प्रकरणाशी संबंधित आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, एसआयटी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करेल.
 

Eknath Khadse land acquisition case 
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपशील समजावून सांगितला. त्यानुसार, मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी २५ जानेवारी २०२२ रोजी राजपत्रात आदेश प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार, १३ जानेवारी २०२३ रोजी सरकारने ५६.८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, काही लोकांनी या जमिनीवर झाडे लावून मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केला होता.चव्हाण यांनी सांगितले की, मोठा मोबदला मिळविण्यासाठी खडसे यांनी २७ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचित Eknath Khadse  जमिनींपैकी काही जमीन खरेदी केली होती. खरेदीखत सादर करताना १५ लाख २२ हजार रुपयांचे मूल्य दाखवले होते. परंतु, ही जमीन लागवडीसाठी उपयुक्त असल्याचे दाखवण्यात आले होते, तसेच खरेदीपूर्वी झाडे लावल्याचेही निदर्शनास आले. यामुळे प्रकरण फसवणूक किंवा नियमाविरुद्ध लाभ घेण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने चर्चेत आले.दरम्यान, महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मोबदला वाटप झाला नाही, त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष फसवणूक झालेली नाही. तरीही, प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या चौकशीत ६ विभागाचे अधिकारीही सहभागी असतील आणि नऊ गावांच्या जमिनींच्या व्यवहाराचा सविस्तर अहवाल तयार करून सभागृहात सादर केला जाईल.या निर्णयामुळे खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि प्रकरणाच्या पुढील तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.