बनावट नोटा बनवणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

*91 लाखांचा मुद्देमाल जप्त *एका आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर, 
fake-currency-interstate-gang-busted : भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत बनावट नोटा व साहित्य असा एकूण 91 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी येथील ऊर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये केली गेली.
 
 
 
fh
 
 
 
या प्रकरणी आरोपी शुभम दिनेश नागर (26, रा. पंचेड, जि. रतलाम, राज्य-मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, उर्जानगर मेजर गेटजवळीला राजश्री अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 203 मध्ये काही व्यक्ती अवैधरित्या 500 रुपयांच्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने शिताफीने सापळा रचून त्या ठिकाणी धाड टाकली असता, त्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लागलेले आढळून आहे. पोलिसांनी फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉल (रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यास बोलावून माहिती घेतली. त्याने तो फ्लॅट मागील एक महिन्यापासून मध्यप्रदेशातील काही लोकांना भाड्याने दिल्याचे सांगितले.
 
 
पोलिसांनी फ्लॅट मालक व पंचाच्या समक्ष त्या फ्लॅटचे कुलूप तोडले. फ्लॅट मालकाच्या उपस्थितीत फ्लॅटची झडती घेतली असता, बेडरूमध्ये 10 खरडयाच्या बॉक्समध्ये भारतीय चलनाच्या नोटाप्रमाणे हुबेहुब दिसणार्‍या 500 रुपयांच्या रंगीत छायांकीत नोटा, एक कलर प्रिंटर व इतर साहित्य असा एकूण 91 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. किरायाणे राहणार्‍या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी शुभम नागर यास ताब्यात घेतले. आरोपीविरूध्द दुर्गापूर पोलिस ठाण्यात कलम 318 (2), 318 (3), 336 (2), 336 (3), 182 (1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक गौरव कार्यदेपाटील, दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकरेडवार, सहायक पोलिस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर व सर्वेश बेलसरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार आदींच्या पथकाने केली.