गडचिरोली जिल्ह्याच्या सुपुत्राची चंदेरी दुनियेत भरारी!

(’घबाडकूंड’ मराठी चित्रपटातून साहिल अन्नलदेवारचे पदार्पण)

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
अहेरी, 
ghabadkund-marathi-movie : गडचिरोली जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो घनदाट जंगलचा परिसर आणि दुर्गमता. पण याच मातीतील गुणवत्तेने आता थेट मराठी सिनेसृष्टीची दारे ठोठावली आहेत. अहेरी या ‘राजनगरी’चा तरुण साहिल अन्नलदेवार लवकरच ‘घबाडकूंड’ या आगामी मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एका दुर्गम भागातील तरुणाने स्वबळावर सिनेसृष्टीत घेतलेली ही झेप संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
 
 
 
jk
 
 
 
‘घबाडकूंड’ हा चित्रपट प्रामुख्याने खजिना शोध, साहस आणि थ्रिलर या विषयावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. साहिलने या चित्रपटात मुख्य सहकलाकाराची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रहस्याचा उलगडा करणारी ही साहसी कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल, अशी चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगली आहे.
 
 
19 जून रोजी हा चित्रपट एकूण 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे विषय हे रहस्यमय खजिना शोध आणि अ‍ॅडव्हेंचर थ्रिलरवर आधारित आहे. दक्षिण गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि अविकसित समजल्या जाणार्‍या भागातून एखादा कलाकार व्यावसायिक चित्रपटात काम करतो, तेव्हा ती केवळ एक वैयक्तिक कामगिरी नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरते. साहिलच्या या यशामुळे अहेरी आणि परिसरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
 
आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 19 जूनची, जेव्हा साहिलचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या या ‘हिर्‍याची’ चमक संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल, यात शंका नाही.
 
 
लहानपणापासून अभिनयाची आवड होतीच. तसेच आई वडिलांचा आशिर्वाद नेहमी बळ देत होता. पण अहेरीसारख्या भागातून इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही संधी मिळाली आहे.
साहिल अन्नलदेवार