कारंजा लाड,
Gram Panchayat officers protest, जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही ठोस निर्णय घेतला नसल्याने जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांच्या वतीने सुरू केलेले असहकार आंदोलन कायम ठेवण्यात आले असून, पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांनी २७ मे २०२५ रोजी सनदशीर मार्गाने आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला प्रथम निवेदन दिले होते. त्यानंतर अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनासोबत चर्चा देखील झाली. मात्र चर्चेनंतर दिलेल्या आश्वासनानुसार ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रमुख मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे युनियनच्या वतीने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये तोडगा न निघाल्यास १६ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हाभर असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत युनियन पदाधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने युनियनच्या वतीने नाईलाजास्तव १६ फेब्रुवारी २०२६ पासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलन सुरू असतानाही ग्रामपंचायत अधिकारी आपल्या अधिनस्त ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज नियमितपणे पार पाडत आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनासोबत असहकार दाखवत त्यांनी काही प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, आंदोलन सुरू होऊन जवळपास तीन आठवडे उलटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत अधिकार्यांच्या मागण्यांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याचा आरोप युनियनने केला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांच्या वतीने सुरू केलेले असहकार आंदोलन कायम ठेवण्यात आले असून पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आहे. ऐन मार्च एंडिंगच्या काळात जिल्हा परिषद प्रशासनाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शयता असून, त्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील.
अमोल इढोळे, जिल्हाध्यक्ष वाशीम