मुंबई,
Investors lose Rs 6 lakh crore अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. आज सेन्सेक्स १३४२ अंकांनी घसरून ७६,८६३.७१ वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ३९५ अंकांनी घसरून २३,८६६.८५ वर बंद झाला. बीएसई १५० मिडकॅप निर्देशांक आणि बीएसई २५० स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली.आजच्या घसरणीमुळे नफा वसूल करणाऱ्या गुंतवणूकदारांव्यतिरिक्त इतर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ४४७ लाख कोटी रुपये होते, जे घसरणीमुळे ४४१ लाख कोटींवर आले. म्हणजेच एक दिवसातच गुंतवणूकदारांचे सुमारे ६ लाख कोटी रुपये बुडाले.

बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढल्यामुळे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी बँक निर्देशांक १.७ टक्क्यांनी घसरला. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्येही घट पाहायला मिळाली.अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या भूराजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचे धोरण अवलंबले आहे. तसेच, रुपया कमजोर होऊन डॉलरच्या तुलनेत १७ पैशांनी घसरून ९१.९७ रुपये झाला, यामुळे बाजारावर दबाव वाढला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, मात्र इराणकडून सुरू असलेला कडवट प्रतिकार आणि अस्थिरता यामुळे संघर्ष कधी संपेल याकडे जगाचे लक्ष लागले आहे.