तभा वृत्तसेवा
हदगाव,
savita-nimdage : समाजातील महिलांनी केवळ घरातील चूल आणि मुलांपुरते मर्यादित न राहता आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या ध्येयाने सातत्याने कार्य करणाèया पळसा येथील सविता निमडगे यांनी आपल्या कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरातील जबाबदाèया सांभाळत प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करत त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतःच तयार केला आणि अनेक महिलांसाठी त्या प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
सविता निमडगे यांनी सुरुवातीला गावातील मुलींना शिलाई कामाचे प्रशिक्षण देत छोट्या स्वरूपात कापड उद्योग सुरू केला. या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. त्यानंतर त्यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गट उभारून पापड उद्योग सुरू केला. गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या उद्योगातून त्यांनी घेतलेले सर्व कर्ज वेळेत परतफेड करून आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. आज त्या स्वतंत्रपणे उद्योग उभारून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करत आहेत.
यासोबतच त्या समूह साधन व्यक्ती म्हणूनही कार्यरत असून महिलांना बचत गटांचे महत्त्व समजावून सांगणे, नियमित बचत करण्याची सवय लावणे, छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे हे कार्य त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे.
सविताताई सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय आहेत. गावात आणि परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्या नेहमी पुढाकार घेतात. गरजू कुटुंबांना मदत करणे, महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणे हे त्यांचे सतत सुरू असलेले कार्य आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत तालुका व जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा त्यांचा गौरव केला आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पळसा परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून अनेक महिलांनी स्वावलंबनाकडे पाऊल टाकले आहे. कष्ट, जिद्द आणि समाजसेवा यांचा संगम असलेले त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे सविता निमडगे या खèया अर्थाने आदर्श महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान केला जात असून गावकèयांसह संपूर्ण परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. सविता निमडगे यांचा प्रेरणादायी प्रवास हा अनेक महिलांसाठी आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजसेवेचा जिवंत आदर्श ठरला आहे.