थकीत कर्जावरील व्याज तात्काळ बंद करा

- विविध कार्यकारी व आदिवासी सहकारी संस्थांची मागणी - अर्जुनी मोरगावत संस्थां पदाधिकार्‍यांची बैठक : आंदोलनाचा इशारा

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
गोंदिया,
stop-interest-on-outstanding-loans : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक १० मार्च रोजी अर्जुनी मोरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३० सप्टेंबर २०२५ पासून जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच आदिवासी संस्थांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणी त्वरित बंद करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अन्यथा संस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
 
 
j lk
 
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संस्थांच्या थकीत कर्जावर व्याज घेण्यात येत असून शेतकर्‍यांवर कर्जाचे ओझे वाढत आहे. यासाठी सर्व संस्था पदाधिकार्‍यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, सन २०२५-२६ च्या चालू पीक कर्जाची मुददल रक्कम थेट संस्थांच्या कर्ज खात्यात मुददल म्हणून जमा करण्यात यावी व सभासदांकडून घेतलेली रक्कम व्याजामध्ये जमा करू नये, याबाबत बँकेने दक्षता घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्जावर संस्थांकडून आकारलेले नियमित व्याज कर्जमाफीची रक्कम आल्यानंतर संबंधित संस्थांना परत देणे बँकेस बंधनकारक राहील, असे ठरविण्यात आले. अन्यथा जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांसमोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक मंडळ व सचिवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला. याशिवाय शासनाकडून कर्जमाफी किंवा अन्य योजनांबाबत येणार्‍या पत्रांची माहिती बँकेने तत्काळ संस्थांना द्यावी, जेणेकरून संस्थांना आवश्यक माहिती वेळेवर पाठविणे सोयीचे होईल.
 
 
तसेच कर्जमाफीसंदर्भात बँकेच्या वतीने वेळोवेळी सूचना व प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डोमाजी बोपचे होते. संस्था संघटनेतर्फे बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी उपाध्यक्षपद भूषविले. तसेच सहकार महर्षी प्रा. सुभाष आकरे व यशवंत मानकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य शंकर पटले, डॉ. योगेश हरिणखेडे, ब्रिजलाल बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुका संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव अरुण गजापुरे इतर पदाधिकारी उपस्थित होते.